वीज पडून आईचा मृत्यू, मुलगा जखमी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 जून 2019

देवळी (जि. वर्धा) : शेतात कपाशीची लागवड सुरू असताना वीज पडल्याने आईचा मृत्यू झाला; तर मुलगा गंभीर झाला. वाटखेडा शिवारात शनिवारी (ता. 22) दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. सुमती सुभाष कारोटकर (वय 55, रा. देवळी), असे मृत आईचे नाव आहे. मुलगा नीलेश सुभाष कारोटकर (वय 32) असे जखमीचे नाव आहे.

देवळी (जि. वर्धा) : शेतात कपाशीची लागवड सुरू असताना वीज पडल्याने आईचा मृत्यू झाला; तर मुलगा गंभीर झाला. वाटखेडा शिवारात शनिवारी (ता. 22) दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. सुमती सुभाष कारोटकर (वय 55, रा. देवळी), असे मृत आईचे नाव आहे. मुलगा नीलेश सुभाष कारोटकर (वय 32) असे जखमीचे नाव आहे.
येथील सुभाष कारोटकर यांचे वाटखेडा चौफुलीच्या समोर वाटखेडा शिवारात पठाड येथे शेत आहे. शनिवारी शेतात कपाशीची टोबणी करण्याकरिता चार महिला मजुरांसह सुमती कारोटकर आणि मुलगा नीलेश कारोटकर दोघेही शेतात गेले होते. दुपारी दोनला जेवण आटोपून मजूर महिला थोड्या अंतरावर कपाशीची लागवड करीत होत्या. पाऊस सुरू झाल्याने आई व मुलगा शेतातील पळसाच्या झाडाजवळ थांबले. नीलेशजवळ मोबाईल होता. विजेचा कडकडाट होताच दोघांच्या अंगावर वीज पडली. यात आई सुमती जागीच ठार झाली. नीलेश गंभीर जखमी झाला. शेतातील मजूर महिलांनी नीलेशला रस्त्यापर्यंत उचलून आणले व कुटुंबीयांना माहिती देऊन त्याला सावंगी येथील रुग्णालयात भरती करण्यात आले. मुलाची प्रकृतीसुद्धा गंभीर असल्याची माहिती आहे. सुमतीच्या मागे पती, दोन मुले, मुली असा आप्तपरिवार आहे.
बाळापूर येथे मुलगा ठार
नागभीड (जि. चंद्रपूर) : तालुक्‍यातील बाळापूर येथे वीज कोसळून 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. चंदन मैद असे त्याचे नाव आहे. आज सायंकाळी वादळवाऱ्यासह जोरदार पाऊस आला. पावसात खेळण्यासाठी चंदन घराबाहेर उभा होता. त्याचवेळी वीज त्याच्या अंगावर कोसळली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
तसेच शंकरपूर येथून जवळच असलेल्या वाकर्ला येथे आज वीज पडून बैल ठार झाला. पाचच्या सुमारास या परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. ऐन हंगामाच्या तोंडावर बैल दगावल्याने शेतकरी उद्धव मोहाड यांच्यावर संकट कोसळले आहे.  

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mother died and son injured in lightning accident