#SundayMotivation 'माँ तुझे सलाम'

नरेंद्र चोरे 
रविवार, 15 डिसेंबर 2019

देशविदेशातील विविध स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी बजावून उपराजधानीला नावलौकिक मिळवून देणाऱ्या अनेक खेळाडूंच्या आईंनी हलाखीच्या परिस्थितीतही आपल्या खेळाडू मुलींचे स्वप्न जोपासले.  मुलींच्या उज्ज्वल करिअरसाठी झटणाऱ्या या आईंना निश्‍चितच "सॅल्यूट' करावा लागेल. 

नागपूर : दर्जेदार खेळाडू घडविणे ही फार मोठी तपश्‍चर्या असून, त्यासाठी स्वत: खेळाडूसह आईवडिलांनाही तितकाच त्याग व कष्ट करावे लागतात. विशेषत: आईला जास्त मेहनत घ्यावी लागते. वेळप्रसंगी तिला करिअरवरदेखील पाणी सोडावे लागते. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चमकलेल्या नागपूर व विदर्भातील अनेक खेळाडूंच्या आईंनी संघर्ष करून आपल्या लाडलीचे स्वप्न साकार केले. मुलींच्या उज्ज्वल करिअरसाठी झटणाऱ्या या आईंना निश्‍चितच "सॅल्यूट' करावा लागेल.

 

हेही वाचा - मित्रासोबत पहाटे फिरायला गेला अन्‌...

 

देशविदेशातील विविध स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी बजावून उपराजधानीला नावलौकिक मिळवून देणाऱ्या अनेक खेळाडूंच्या आईंनी हलाखीच्या परिस्थितीतही आपल्या खेळाडू मुलींचे स्वप्न जोपासले. कुणी डबे बनवून मुलीला घडविले तर कुणी मोलमजुरी करून लाडलीच्या करिअरला योग्य दिशा दिली. काहींना तर चक्‍क डॉक्‍टरकीवर पाणी सोडावे लागले. त्यांचा हा त्याग व तपश्‍चर्या निश्‍चितच परिस्थितीचे भांडवल करणाऱ्या खेळाडू व पालकांसाठी प्रेरणादायी म्हणावी लागेल. 

Image may contain: 2 people, people smiling, closeup
मोना मेश्राम व  आई छाया

मेश्राम व आई छाया

मायलेकीच्या संघर्षाचे आदर्श उदाहरण आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू मोना मेश्राम व तिची आई छाया यांचे आहे. मुलीची खेळात रुची असल्याचे लक्षात आल्यानंतर छाया यांनी तिला "मोटिव्हेट' केले. दहा बाय दहाच्या खालीत राहणाऱ्या छाया यांनी स्वत: डबे बनवून मोनाची आवडनिवड जपली. क्रिकेट हा महागडा खेळ असतानाही तिने आपल्या मुलीला काहीही कमी पडू दिले नाही. छाया यांनी घेतलेल्या कष्टाचे मुलीनेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू बनून चीज केले. मोनाने तब्बल दोनवेळा भारत (2013), आणि इंग्लंडमध्ये (2017) झालेल्या आयसीसी विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व केले. मोना रेल्वेत लागल्यापासून मेश्राम परिवाराची आर्थिक परिस्थिती सुधारली खरे. पण "मेस'चा व्यवसाय अजूनही सुरूच आहे. 

Image may contain: 2 people, people standing
प्राजक्ता गोडबोले व आई अरुणा

प्राजक्ता गोडबोले व आई अरुणा

मोनाप्रमाणेच आंतरराष्ट्रीय धावपटू प्राजक्ता गोडबोलेच्याही आईने गरिबीतून मुलीला घडविले. सिरसपेठ येथील झोपडपट्‌टीत राहणाऱ्या प्राजक्‍ताच्या वडिलांचा अपघात झाल्याने अपंगत्व आले. त्यामुळे संसाराचा गाडा चालविण्याची जबाबदारी आई अंथरुणावर येऊन पडली. अरुणाने कॅटररकडे स्वयंपाक करून लाडलीला राष्ट्रीय खेळाडू बनविले. मैदानावर सुसाट गतीने धावणाऱ्या प्राजक्‍ताने अनेक राज्य व राष्ट्रीय स्पर्धा गाजवून शहराला नावलौकिक मिळवून दिला. इटलीतील विश्‍वविद्यापीठ क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्राजक्‍ताने तब्बल 18 वर्षांनंतर नागपूर विद्‌यापीठाला सुवर्णपदक मिळवून दिले होते. 

Image may contain: 2 people, people smiling, people standing
पूनम कडव व आई रमा

पूनम कडव व आई रमा

चुनाभट्‌टी येथील झोपडपट्‌टीत राहणारी आंतरराष्ट्रीय हॅण्डबॉलपटू पूनम कडव संघर्षाचे आणखी एक आदर्श उदाहरण. गरिबी व प्रतिकूल परिस्थितीतही जिद्दीने स्वप्नाचा पाठलाग करणाऱ्या पूनमचा परिवारही अतिशय गरीब आहे. तिचे वडील महापालिकेत सफाई कामगार, तर आई रमा मिळेल ते मोलमजुरीचे काम करते. घरची कमाई जेमतेम असूनही या मातेने पूनमचे क्रीडाप्रेम जपले. शिवछत्रपती पुरस्कारविजेत्या पूनमने राज्य व राष्ट्रीय स्पर्धांसह बांगलादेश, थायलंड व उझबेकिस्तानमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके जिंकून आईची स्वप्नपूर्ती केली. 

Image may contain: 2 people, people smiling, stripes and closeup
ज्योती चौहान व आई सुशीला

ज्योती चौहान व आई सुशीला

नागपूरपासून 14 किमी अंतरावर पंचशीलनगर (इसासनी) येथील टीनपत्र्याच्या घरात राहणाऱ्या चौहान परिवाराचीही तीच कहाणी. आंतरराष्ट्रीय धावपटू असलेल्या ज्योतीचे आईवडील अशिक्षित व मोलमजुरी करणारे. पावसाळ्यात घरासमोर गुडघाभर चिखल आणि अंधार. अशावेळी आई सुशीलाने प्रकृती व परिस्थितीशी दोन हात करीत ज्योतीला घडविले. ज्योतीनेही राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर गरुडझेप घेत आपल्या आईवडिलांची मान उंचावली. ज्योतीला एकेकाळी सरावासाठी दररोज हिंगण्यावरुन सायकलने विद्यापीठ मैदानावर यावे लागे, हे उल्लेखनीय. 

Image may contain: 2 people, people smiling, people standing
मालविका बन्सोड व आई तृप्ती

आईवडिलांसाठी तारेवरची कसरत!

चौघींच्या तुलनेत आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू मालविका बन्सोडची परिस्थिती चांगली आहे. पण मुलीच्या उज्ज्वल करिअरसाठी तिच्या आईवडिलांना त्याग करावा लागतो आहे. मालविकाच्या आईवडिलांचे खासगी "डेंटल क्‍लिनिक' आहे. मात्र विविध स्पर्धांच्या निमित्ताने मुलींसोबत जावे लागत असल्याने त्यांनाही फटका बसतो आहे. कधी आई (डॉ. तृप्ती), तर कधी तिचे वडील. त्यामुळे आलटून पालटून एकेकाला जावे लागते. हे सर्व "मॅनेज' करताना प्रचंड त्रास होतो. मात्र मुलीसाठी ही तारेवरची कसरत करावीच लागते, असे डॉ. तृप्ती यांनी सांगितले. भविष्यातील ऑलिम्पिकपटू म्हणून बघितल्या जात असलेल्या मालविकाने नेपाळ, मालदीव, बहरिन, कॅनडा, बल्गेरियातील स्पर्धांमध्ये पदके जिंकून परिवारासह शहराचीही मान उंचावली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mother give you salute