आईचा मृत्यू, चिमुकला बचावला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 ऑगस्ट 2019

अमरावती ः मोर्शी तालुक्‍यातील विचोरी गावात कुलरजवळ विजेचा जोरदार धक्का लागून महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर, तीन वर्षांचा चिमुकला दूर फेकल्या गेल्यामुळे बचावला.

अमरावती ः मोर्शी तालुक्‍यातील विचोरी गावात कुलरजवळ विजेचा जोरदार धक्का लागून महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर, तीन वर्षांचा चिमुकला दूर फेकल्या गेल्यामुळे बचावला.
सुषमा नीलेश मेश्राम (वय 24 रा. विचोरी) असे मृत महिलेचे नाव असून, वेदांत नीलेश मेश्राम (वय 3 वर्षे) हा किरकोळ जखमी असून, त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. शनिवारी (ता. दहा) सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. घटनेच्या वेळी सदर महिलेचा पती व सासरे हे घराबाहेर होते. सुषमा ही घरात आतल्या खोलीत असलेला कूलरचे वायर काढत असताना ही घटना घडली. घरात अर्थिंग नाही, शिवाय कुलरजवळ बोर्ड असून, बोर्डमध्ये कुलरला सप्लाय देणारा जो वायर जोडला होता. त्यालाही पीन नव्हती. माचिसच्या काड्या टोचून कुलरचा वायर बोर्डमध्ये लावला होता. संततधार पावसामुळे घरात ओलावा होता. त्यातून प्रथम सुषमा यांना विजेचा जोरदार धक्का बसल्याने त्यांचा मृत्यू झाला, तर त्याचवेळी आईला बिलगलेला तीनवर्षांचा चिमुकला वेदांत दूर फेकल्या गेल्यामुळे तो वाचला, असे शिरखेड ठाण्याचे श्री. टप्पे यांनी सांगितले. घटनास्थळी बेशुद्ध पडलेल्या वेदांतला त्याच्या आजोबांनी उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असून, त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. शिरखेड पोलिसांनी सुषमा मेश्राम यांच्या मृत्यूप्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद घेतली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mother's death, Chimuk survives