मंत्र्यांचे कपडे फाडून तुडवून मारा : राजू शेट्टींचे वादग्रस्त वक्तव्य

Raju_Shetty
Raju_Shetty

बाळापूर : 'गावात येऊन खोटी आश्वासने देणाऱ्या मंत्र्यांचे कपडे फाडून तुडवून तुडवून मारा. पोलिससुद्धा काहीच करणार नाहीत. तुम्हीच त्यांना मारले पाहिजे, असे वादग्रस्त वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे. 

बाळापूर तालुक्‍यातील निंबा गावात बुधवारी रात्री आयोजित कापूस सोयाबीन मेळाव्यात शेट्टी यांनी शेतकऱ्यांसमोर हे वादग्रस्त विधान केले आहे. राजू शेट्टी सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. 

राजू शेट्टी यांनी वादग्रस्त वक्तव्य करत खळबळ उडवून दिली आहे. 'खोटी आश्वासने देणाऱ्या मंत्र्यांना आता मारले पाहिजे. त्यासाठी मी कोल्हापूरमधून माणसे पाठवेन याची वाट पाहू नका. तुम्हालाच त्यांना मारायचे आहे. सरकार आपले देणे लागते. आम्ही बॅंकेचे देणे देऊ शकत नाही; मग आम्ही मंत्र्यांना ठोकलं तर बिघडले कुठे?' असा प्रश्नही त्यांनी केला. 

केंद्र सरकारने 'अच्छे दिन'च्या नावाखाली जनतेची फसवणूक केली. त्यांनी 'अच्छे दिन' तर आणलेच नाही, उलट 'लुच्चे दिन' आणले आहेत. शेतकरी सातत्याने नागविला जात आहे. कापूस, सोयाबीनला भाव मिळत नाही. त्यासाठी शेतकऱ्यांनी पेटून उठले पाहिजे. शेतकऱ्यांनी शासनाच्या मंत्र्यांना ठोकून काढल्याशिवाय, त्यांना जोडे मारल्याशिवाय न्याय मिळणार नाही. मंत्र्यांना मारले तर पोलिस तुमचे काहीही करू शकत नाहीत. तुमच्यामुळे भाजप सत्तेत आहे. शासनाला वठणीवर आणण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या सदैव पाठीशी आहे, असे प्रतिपादन शेट्टी यांनी केले. 
ते म्हणाले, ''पश्‍चिम महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस, दुधाची भाववाढ असे आंदोलन करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. आता विदर्भात कापूस, सोयाबीनचे दर घसरले. त्यांना भाव मिळत नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत; परंतु शासनाला त्याचे काही देणे-घेणे नाही.'' 

मंत्र्याला भोसकू : तुपकर 
प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनीही वादग्रस्त वक्तव्य केले. 'यापुढे एकाही शेतकऱ्याने आत्महत्या करायची गरज नाही. गरज पडल्यास कापूस-सोयाबीनला भाव न देणाऱ्या मंत्र्यांना पेटवा, खासदार-आमदारांना ठोका; पण आत्महत्या करू नका,' असे सांगतानाच 'शेट्टींनी सांगितले तर एखाद्या मंत्र्याला भोसकायलाही कमी करणार नाही,' असे वक्तव्य तुपकर यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com