अमरावती : MSEB कार्यालयासमोर आंदोलन करणे नवरदेवाला पडले महागात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जुलै 2019

अमरावती महावितरण कार्यालयासमोर उपोषण मंडपात लग्न करण्याच्या तयारीत असलेल्या उपोषणकर्त्या नवरदेवाला महावितरणने चांगलाच 'शॉक' दिला.

अमरावती : अमरावती महावितरण कार्यालयासमोर उपोषण मंडपात लग्न करण्याच्या तयारीत असलेल्या उपोषणकर्त्या नवरदेवाला महावितरणने चांगलाच 'शॉक' दिला. उपोषण मंडपात लग्न करण्याचा निर्णय मागे घ्या, अन्यथा शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. तसेच त्याहून अधिक कठोर करवाईही होऊ शकते असा धमकीवजा समज कंपनीने दिल्याने निखिल तिखे यांनी आपले लग्न आपल्या पूर्वीच्या नियोजित स्थळीच आज उरकले.

महावितरणतर्फे आपल्या मागण्या पूर्ण करण्याचे तोंडी आश्वासन मिळाले असल्याने उपोषण मंडपातील लग्न सोहळा स्थगित करण्यात आल्याचे संघटनेच्या अध्यक्षांनी सांगितले. तर महावितरणतर्फे वरिष्ठ स्तरावर चर्चा करुन याबाबत निर्णय होईल. अद्याप कुठल्याही प्रकारचे आश्वासन उपोषण करणाऱ्यांना दिले नसल्याचे महावितरणच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले.

गुरुवारी उपोषण मंडपात निखिलला हळद लावण्यात आली आणि आज त्याच उपोषण मंडपात निखिलचे लग्न होणार होते. मात्र, महावितरणतर्फे एक पत्रक काढून उपोषणकर्त्याना कारवाई करण्याचे संकेत देताच आज निखिलचे लग्न नियोजित स्थळीच झाले असले तरी येणाऱ्या दिवसांत महावितरण निखिलवर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, अशी माहिती महावितरणचे जनसंपर्क अधिकारी फूलसिंह राठोड यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MSEB takes Action against Nikhil Tikhe who doing his agitation infront of MSEB Office