मुकेश शाहूवर खंडणीचा गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 मे 2017

'मुकेश आणि टीम' पोलिसांच्या रडारवर

'मुकेश आणि टीम' पोलिसांच्या रडारवर
नागपूर - मध्यवर्ती कारागृहातून पाच दिवसांपूर्वीच सुटून आलेल्या शहरातील कुख्यात खंडणीबहाद्दर मुकेश शाहू याने एका लोहा व्यापाऱ्याला जिवे मारण्याची धमकी देऊन 50 हजार रुपये प्रतिमाह खंडणीची मागणी केली. या प्रकरणी मुकेश शाहूवर कळमना पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दिलीप ग्वालवंशीच्या दहशतीला सुरुंग लावणाऱ्या आयुक्‍तांनी आता शहरातील खंडणीबहाद्दरांवर कारवाई करण्याकडे मोर्चा वळवला आहे. त्यामुळे शहरातील अनेक व्यापाऱ्यांना खंडणी मागून गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या मुकेश शाहू आणि त्याचे साथीदार सध्या पोलिस आयुक्‍तांच्या रडारवर आहेत.

मुकेश शाहू हा साथीदारांसह शेकडो व्यापाऱ्यांना खंडणी मागून गुन्हेगारीत सक्रिय आहे. यापूर्वी त्याच्यावर खंडणीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. मुकेश शाहूंवर गुन्ह्यांची मालिका पाहता तत्कालीन पोलिस आयुक्‍त शारदाप्रसाद यादव यांनी धडक कारवाई केली होती. त्यानुसार मुकेश शाहूला मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध (एमपीडीए) कारवाई करण्यात आली होती. गेल्या पाच दिवसांपूर्वीच तो जेलमधून सुटून आला. बाहेर येताच त्याने शुक्रवारी सहा वाजता कळमन्यातील लोहा व्यापारी नीलेश रामबाबू शाहू (वय 30, सुदर्शन चौक, रामपाल फॅक्‍टरी) यांना फोनवरून खंडणीसाठी धमकी दिली. त्यानंतर नीलेश यांना मुकेशने त्याच्या कार्यालयात बोलवले. "तुला लोहा व्यवसाय करायचा असेल तर दर महिन्याला 50 हजार रुपये द्यावे लागतील, अन्यथा जिवे मारण्यात येईल.' अशी धमकी दिली. भेदरलेल्या नीलेश शाहू यांनी तेथून सुटका केली. सायंकाळी त्यांनी कळमना पोलिस स्टेशन गाठले. त्यांनी पोलिस निरीक्षकांची भेट घेऊन घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी तक्रारीवरून मुकेश शाहूच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला.

कळमन्यात मुकेशची दहशत
मुकेश शाहू याने अनेक व्यापाऱ्यांकडून खंडणी वसुली केली आहे. यापूर्वी त्याच्यावर साथीदाराच्या मदतीने शाहू नावाच्या व्यापाऱ्याला पिस्तूल दाखवून 50 हजार रुपये हिसकावले होते. या प्रकरणी लकडगंज पोलिस ठाण्यात मुकेश आणि त्याच्या सहा सहकाऱ्यांवर खंडणी आणि आर्म ऍक्‍टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Web Title: mukesh shahu tribute crime