खो-खो स्पर्धेत मुंबईचा डंका

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

  • डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात पश्चिम विभागीय महिला स्पर्धा
  • पाच राज्यातील 46 विद्यापीठांचा सहभाग
  • मुंबई विद्यापीठ प्रथम, पूणे द्वितीय, कोल्हापूर तृतीय, अमरावती संघाला चवथी रँक
  • आॅल इंडिया युनिवर्सीटी स्पर्धेसाठी वर्णीफेब्रुवारी 2020 मध्ये गोरखपूर येथे भिडणार चारही विभागाचे संघ

अकोला ः डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात 19 ते 23 नोव्हेंबर दरम्यान खेळल्या गेलेल्या भारतीय आंतर विद्यापीठ पश्चिम विभागीय महिला खो-खो स्पर्धेत सर्वोच्च खेळीचे प्रदर्शन करत, मुंबर्ई विद्यापीठ संघाने प्रथम रँक आणि विजेतेपद पटकाविले. पूणे विद्यापीठ संघाने दुसरी रँक, कोल्हापूर तिसरी तर, अमरावती विद्यापीठ संघाने चवथी रँक मिळविली. त्यामुळे या चारही विद्यापीठ संघाची आॅल इंडिया युनिवर्सीटी टूर्नामेंटसाठी निवड झाली आहे.

डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला व असोसिएशन ऑफ यूनिवर्सिटी इंडिया नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये सहभागासाठी गोवा, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात व राजस्थान मधील 61 विद्यापीठाच्या खो-खो महिला संघांनी नोंदणी केली होती. परंतु, प्रत्यक्ष 46 विद्यापीठ संघांनी सहभाग नोंदविला.

Image may contain: 18 people, people smiling, people standing

चुरशीचे सामने
पहिल्या दिवसापासूनच चुरशीचे आणि रंगतदार सामने याठिकाणी पाहायला मिळाले. शुक्रवारी आणि शनिवारी चार संघांमध्ये अंतिम सहा सामने खेळले गेले. त्यामध्ये मुंबई विद्यापीठ संघाने पूणे, कोल्हापूर व अमरावती या तिनही संघांना चीत करून प्रथम रँक पटकाविली तर, सावित्रीबाई फूले विद्यापीठ संघाने शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि संत गाडगे बाबा विद्यापीठ अमरावती यांना पराजित करुन दुसरी रँक मिळविली. कोल्हापूर संघाने एकच अमरावती संघाला हरवून तिसरी तर, या साखळी सामन्यात एकही सामना जिंकता आला नसल्याने, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ संघाला चवथ्या रँकवर समाधान मानावे लागले. शनिवारी (ता.२३) या स्पर्धेचा थाटात समारोप झाला. समारोपीय सत्राचे अध्यक्ष तथा संचालक संशोधन डॉ. विलास खर्चे यांचे हस्ते विजेत्या संघांना बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी ओझोन हॉस्पिटलचे संचालक डॉ.विनीत हिंगणकर, अकोला कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.श्यामसुंदर माने, आयोजन समितीचे सचिव डॉ. मोहन तोटावार, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ.आर.जी. देशमुख उपस्थित होते.

Image may contain: 18 people, people smiling, people standing

बहिनाबाई चौधरी विद्यापीठाने स्थान गमावले
गतवर्षी या स्पर्धेमध्ये पहिल्या चार रँक प्राप्त करण्याऱ्या विद्यापीठ संघापैकी मुंबई विद्यापीठ संघ, सावित्रीबाई फूले विद्यापीठ संघ आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर संघांने त्यांची रँक कायम राखण्यात यश मिळविले. मात्र बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव संघाला त्यांची रँक टिकविता आली नसून, चवथी रँकवर संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ संघाने ताबा मिळविला.

Image may contain: 16 people, people smiling

फेब्रुवारीमध्ये आॅल इंडिया टूर्नामेंट
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात खेळल्या गेलेल्या पश्चिम विभागीय स्पर्धेत पहिल्या चार रँक पटकाविणाऱ्या संघांची आॅल इंडिया युनिवर्सीटी टूर्नामेंटसाठी वर्णी लागली असून, दिनदयाल युनिवर्सीटी गोरखपूर येथे फेब्रुवारी 2020 च्या पहिल्या आठवड्यात हे सामने खेळले जाणार आहेत. या स्पर्धेमध्ये चारही विभागातील पहिल्या चार रँक पटकाविणाऱ्या संघांमध्ये सामने रंगणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai bet on Kho Kho tournament