मुंबई स्फोटातील आरोपी अब्दुल गनी तुर्कचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 एप्रिल 2019

आज शवविच्छेदन 
गनीवर शुक्रवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन होणार आहे. तो मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी आहे. त्यामुळे पोलिस, कारागृह प्रशासन आणि विशेष शाखेकडून शवविच्छेदन कक्ष परिसरात चोख सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे.

नागपूर - बॉम्बस्फोटांची मालिका घडवून १९९३ साली संपूर्ण मुंबईला हादरवून सोडणाऱ्यांपैकी एक प्रमुख आरोपी अब्दुल गनी इस्माईल तुर्क याचा आज नागपुरात मृत्यू झाला. सेंच्यूरी बाजार येथे बॉम्ब ठेवणारा गनी २०१२ पासून नागपूरच्या कारागृहात बंदिस्त होता. टाडा न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती.

मूळचा मुंबईचा असलेला गनी (वय ६८) हवाला एजंट होता. गुरुवारी सकाळी त्याला अस्वस्थ वाटू लागले. छातीत दुखत असल्याची तक्रार करताच कारागृह प्रशासनाने त्याला उपचारासाठी मेडिकल रुग्णालयात पाठविण्यात आले. दुपारी बाराच्या सुमारास मेडिकलमध्ये पोहोचल्यानंतर डॉक्‍टरांनी तपासताच त्याला मृत घोषित केले. कायदेशीर प्रक्रियेनंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आला. सायंकाळी उशीर झाल्याने शवविच्छेदनाची प्रक्रिया उद्या शुक्रवारी उरकली जाणार आहे. दरम्यान, कारागृह प्रशासनाकडून मृताच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. शुक्रवारी ते येथे दाखल होणार आहेत.

११९ जणांचा बळी
अब्दुल गनी हवाला एजंट होता. या खटल्यातील मुख्य आरोपींपैकी एक असलेल्या टायगर मेमनच्या हवाला रॅकेटमध्ये तो काम करत होता. अब्दुल गनीने १९९३ च्या बॉम्बस्फोटात आरडीएक्‍सने भरलेली कार मेमनच्या घरापासून सेंच्यूरी बाजार येथे नेली आणि उडिपी हॉटेलजवळ पार्क केली. या स्फोटात ११९ जणांचा मृत्यू झाला आणि २२९ जण जखमी झाले. तर तब्बल २ कोटी ४१ लाख रुपयांचे नुकसान झाले होते. गनीने पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुलीदेखील दिली होती. स्फोटकांनी भरलेली कार पार्क केल्यानंतर मी नमाजासाठी मशिदीत गेलो होतो, असे त्याने सांगितले होते. 

कुठे झाले होते स्फोट?
मुंबई हादरवून टाकणारे हे स्फोट १२ ठिकाणी झाले होते. सेंच्यूरी बाजारसह मुंबई स्टॉक एक्‍स्चेंज, काथा बाजार, सेना भवनाजवळील पेट्रोलपंप, माहिम कॉज वे, एअर इंडियाची इमारत, झवेरी बाजार, हॉटेल सी रॉक, प्लाझा थिएटर, जुहू आणि विमानतळाजवळील सेंटॉर हॉटेल तसेच सहारा विमानतळ येथे १२ मार्च १९९३ रोजी स्फोट झाले होते. यात एकूण २५७ जणांचा मृत्यू झाला, तर १ हजार ४०० जण जखमी झाले होते. या प्रकरणातील एकूण शंभर आरोपींपैकी ९९ जणांना शिक्षा सुनावण्यात आली असून एकाला फाशी देण्यात आली आहे.

मेमनचा सहकारी
टाडा न्यायालयाने गनीला बॉम्बस्फोटाच्या आरोपाखाली दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. २०१२ मध्ये त्याला मुंबईच्या कारागृहातून नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात पाठविले होते. याच कारागृहात त्याचे सहकारी याकुब मेमन व इतरही आरोपी होते. मेमनला नागपूर कारागृहातच फाशी देण्यात आली. २००३ सालच्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी मोहंमद हनिफचा अलीकडेच कारागृहात शिक्षा भोगत असताना मृत्यू झाला. 

Web Title: Mumbai Bomb Blast Accused Abdul Gani Turk Death