नागपूरमध्ये लवकरच सी प्लेन!

मंगेश सौंदाळकर
गुरुवार, 1 जून 2017

सागरमाला प्रकल्पाअंर्तगत उपक्रम; मुंबईसाठीही चाचपणी

सागरमाला प्रकल्पाअंर्तगत उपक्रम; मुंबईसाठीही चाचपणी
मुंबई - विदर्भातील पर्यटकांना आकर्षित करण्याकरिता महाराष्ट्र सागरी मंडळ (एमएमबी), "महाजेनको' आणि नागपूर सुधार प्रन्यासच्या माध्यमातून नागपूरमध्ये सी प्लेन सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूर-ताडोबा-शेगाव येथे ही सुविधा सुरू होईल. सागरमाला प्रकल्पांतर्गत हा उपक्रम राबवला जाणार आहे. याकरिता "एमएमबी'ने स्वारस्याच्या निविदा मागवल्या आहेत. मुंबईतही हा उपक्रम सुरू करण्याबाबत चाचपणी सुरू आहे.

नागपूरमधील वनसंपदा, जलाशय, औष्णिक ऊर्जा प्रकल्प पाहण्याकरिता पर्यटक मोठ्या संख्येने येतात. या परिसरात पेपर मिल, सेंट्रल थर्मल पॉवर स्टेशन, सिमेंटचे कारखाने आहेत. तेथे जाण्याकरिता हेलिकॉप्टरशिवाय पर्याय नसतो. केंद्र सरकारच्या जहाजबांधणी मंत्रालयाने सागरमाला प्रकल्पांर्तगत नागपूर-ताडोबा-शेगाव या ठिकाणी सी प्लेन सुरू करण्याचा मानस व्यक्त केला आहे. "महाजेनको'चे कोराडी येथे थर्मल पॉवर स्टेशन आहे. तेथील तलावात वीजनिर्मिती केली जाते. ताडोबाच्या इरई तलावातही वीजनिर्मिती होते. येत्या काळात नागपूर मध्यवर्ती हब होणार आहे. त्यासाठी नागपूर सुधार प्रन्यास, एमएमबी आणि महाजेनकोच्या माध्यमातून सी प्लेन सुरू केले जाणार आहे.

या प्रकल्पाकरिता महाजेनकोने तीन तलाव वापरण्याकरिता देण्याचा निर्णय घेतला आहे. विमानांना इंधन भरण्याकरिता नागपूर फ्लाइंग क्‍लबची मान्यता घेतली जाणार आहे. प्रकल्पाकरिता एमएमबीने स्वारस्याच्या निविदा मागवल्या आहेत. या प्रकल्पाला राज्य सरकारने तत्त्वतः मंजुरी दिली आहे. प्रकल्पाकरिता लागणारी पायाभूत सुविधा "एमएमबी' पुरवणार आहे. तसेच महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळ आणि महाजेनकोची मदत घेतली जाईल. प्रकल्पाकरिता नागपूर सुधार प्रन्यासने विकास आराखडा (डीपीआर) तयार केला आहे. पर्यटन आणि वनसंपदांचाही विचार केला जाणार आहे. केंद्र सरकारच्या नौकायन मंत्रालयाला तो डीपीआर पाठवला जाणार आहे. मंत्रालयाकडून मान्यता मिळाल्यावर एमएमबी त्याचा अभ्यास करेल. केंद्र आणि राज्य सरकार या प्रकल्पाकरिता निधी देणार आहे.

नागपूरमध्ये सी प्लेन सेवा सुरू करण्याचा मानस आहे. सुरवातीला ही सुविधा कोराडी येथे सुरू केली जाईल. याकरिता स्वारस्याच्या निविदा मागवल्या आहेत. नागपूरप्रमाणे मुंबईतही ही सेवा सुरू करण्याबाबत चाचपणी सुरू आहे. बेलापूर, वांद्रे येथील जागेत सी प्लेन सेवा सुरू करता येईल.
- अतुल पाटणे, सीईओ, महाराष्ट्र सागरी मंडळ

Web Title: mumbai maharashtra seaplane comming in nagpur