मुंबई-नागपूर महामार्गाने शेतकरी उद्‌ध्वस्त, अधिकारी समृद्ध

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 14 डिसेंबर 2016

नागपूर - मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरील रस्ते आणि मेगासिटीशेजारी राज्यातील ज्येष्ठ आजी-माजी सनदी अधिकाऱ्यांनी स्वतःसह नातेवाइकांच्या नावे खरेदी केलेल्या शेकडो हेक्‍टर जमीनप्रकरणाचे पडसाद मंगळवारी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही उमटले. याप्रकरणी विरोधी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या आमदारांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. तसेच विधिमंडळात आवाज उठविणार असल्याचेही विरोधकांनी स्पष्ट केले.

मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नगर, अमरावती आणि नागपूर या जिल्ह्यांना जोडणारा मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग राज्य सरकारने प्रस्तावित केला आहे. या महामार्गावरील रस्ते आणि मेगासिटीजवळ काही ज्येष्ठ आजी-माजी सनदी अधिकाऱ्यांनी तब्बल आठशे एकराहून अधिक जमीन खरेदी केली आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्‍यात या जमिनींची खरेदी झाली आहे. विशेष म्हणजे, या महामार्गाला आवश्‍यक मंजुऱ्या मिळण्यापूर्वीच हे जमीन खरेदी व्यवहार झाले आहेत. सरकारी पातळीवरील गोपनीय माहितीचा वापर स्वतःसह नातेवाइकांच्या लाभासाठी करून एकप्रकारे ही संघटित लूटमारच केली असल्याची टीका राजकीय वर्तुळातून होत आहे. त्यामुळे या माध्यमातून मोठा जमीन गैरव्यवहार उघडकीस येण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

सध्या नागपुरात सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही यावरून वेगवेगळ्या चर्चा होत आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही या मुद्यावर विधिमंडळात आवाज उठविणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे अधिकाऱ्यांनी संगनमताने केलेल्या या कटकारस्थानावरून हिवाळी अधिवेशनाचे उर्वरित दिवस गाजणार अशी चिन्हे आहेत.

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गामुळे या भागातील शेतकरी उद्‌ध्वस्त होणार आहेत. तसेच या महामार्गाचा लाभ शेतकऱ्यांना न होता यातून अधिकारीच समृद्ध होणार आहेत.
- जयंत पाटील, आमदार

Web Title: mumbai-nagpur highway