शहर बसथांब्यांवर करा मनपाच्या तक्रारी! 

शहर बसथांब्यांवर करा मनपाच्या तक्रारी! 

नागपूर - स्मार्ट सिटीकडे आगेकूच करीत असलेल्या संत्रानगरीतील शहर बसथांब्यांवरूनही नागरिकांना प्रशासनाची माहिती मिळणार आहे. शहरातील 40 शहर बसस्थानकांवर "स्मार्ट किऑस्क' लावण्याचे काम वेगाने सुरू आहे. नागरिकांना येथून जन्म, मृत्यू प्रमाणपत्र, नो ड्यू प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करता येईल. शिवाय कचरा, दूषित पाणी आदींच्या तत्काळ तक्रारीही करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. 

शहरात स्मार्ट सिटी प्रकल्पाची कामे वेगाने सुरू आहेत. स्मार्ट ऍन्ड सेफ सिटी प्रकल्पांतर्गत रामदासपेठेत पाचशे मीटर लांबीची स्मार्ट पार्किंग तयार करण्यात आली. स्मार्ट पार्किंगसाठी एजन्सी नियुक्त करण्यात येणार असून, आचारसंहिता संपल्यानंतर स्मार्ट पार्किंगसाठी निविदा मागविण्यात येणार आहेत. याशिवाय शहरातील चौकांमध्येही साडेतीन हजार सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून, मनपाच्या प्रशासकीय इमारतीच्या सहाव्या माळ्यावर संचालक केंद्र सुरू आहे. आता स्मार्ट ऍन्ड सेफ सिटी प्रकल्पांतर्गत शहरातील 40 बस थांबे स्मार्ट करण्यात येत आहे. बसथांब्यांवर "स्मार्ट किऑस्क' लावण्याचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. या "स्मार्ट किऑस्क'मधून नागरिकांना महापालिकेच्या कामांबाबत ऑनलाइन तक्रार नोंदविता येणार आहे. घराच्या बाजूला पडलेला कचरा, नळांना येणारे दूषित पाणी, कमी दाबाने येणारे पाणी, बंद पथदिवे, रस्त्यांवरील खड्डे आदींची तक्रार नागरिकांना करता येणार असून त्यावर तत्काळ उपाययोजना केली जाणार असल्याने शहर सुस्थितीत येऊन खऱ्या अर्थाने स्मार्ट, स्वच्छ व नीटनेटके होण्यास मदत होणार आहे. याशिवाय नागरिकांना या किऑस्कद्वारे महापालिकेद्वारे देण्यात येणारे जन्म, मृत्यू प्रमाणपत्र, नो ड्यू सर्टिफिकेट आदींसाठीही नोंदणी करणे शक्‍य होईल. राज्य सरकारच्या "आपले सरकार' पोर्टलवर सरकारच्याही तक्रार नागरिकांना करणे शक्‍य होणार असून, विविध योजनांबाबत माहितीही मिळणार आहे. 

520 कोटींचा प्रकल्प 
स्मार्ट ऍन्ड सेफ सिटी प्रकल्प एकूण 520 कोटींचा आहे. यातील 146 कोटी देखभाल, दुरुस्तीसाठी असून 350 कोटींचे इन्फ्रास्ट्रक्‍चर उभारण्यासाठी आहे. यात साडेतीन हजार सीसीटीव्ही कॅमेरे, रामदासपेठेत 500 मीटर लांबीची स्मार्ट पार्किंग तयार करण्यात आली असून आता बसथांब्यांवर स्मार्ट किऑस्क लावण्यात येत आहे. 

स्मार्ट किऑस्कद्वारे नागरिकांच्या महापालिकेपर्यंतच्या फेऱ्या कमी होणार आहे. नागरिकांना बसथांब्यावरील स्मार्ट किऑस्कवर ऑनलाईन तक्रारी, प्रमाणपत्रांसाठी अर्ज करता येणार आहे. बसथांब्यावर बसची वेळ, बसचे मार्ग आदीचीही माहिती पॅसेंजर इन्फरमेशन सिस्टिमद्वारे मिळणार आहे. 
-डॉ. रामनाथ सोनवणे, सीईओ, नागपूर स्मार्ट ऍन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलमपेंट कॉर्पोरेशन लिमिटेड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com