महापालिकेचा कारभार रामभरोसे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

महापालिकेचा कारभार रामभरोसे
नागपूर : महापालिकेचे आयुक्त वीरेंद्र सिंग रजेवर गेले आहेत. त्यांच्या प्रभाराची जबाबदारी सरकारने अद्याप कुणाकडे दिली नाही. याशिवाय दोन उपायुक्तही सुटीवर असून, महापौर नंदा जिचकारही मुंबईला गेल्या आहेत. परिणामी महापालिकेचा कारभार तूर्तास रामभरोसे सुरू असल्याचे चित्र आहे.

महापालिकेचा कारभार रामभरोसे
नागपूर : महापालिकेचे आयुक्त वीरेंद्र सिंग रजेवर गेले आहेत. त्यांच्या प्रभाराची जबाबदारी सरकारने अद्याप कुणाकडे दिली नाही. याशिवाय दोन उपायुक्तही सुटीवर असून, महापौर नंदा जिचकारही मुंबईला गेल्या आहेत. परिणामी महापालिकेचा कारभार तूर्तास रामभरोसे सुरू असल्याचे चित्र आहे.
महापालिका आयुक्त वीरेंद्र सिंग आईच्या प्रकृतीनिमित्त 24 ऑगस्टपर्यंत सुटीवर आहेत. त्यांनी याबाबत रीतसर अर्जही दाखल केला. त्याचवेळी आयुक्तांचा प्रभार जिल्हाधिकारी किंवा इतर अधिकाऱ्यांकडे सोपविणे क्रमप्राप्त होते. मात्र, सरकारकडून अद्याप प्रभारी आयुक्तांबाबत आदेश काढण्यात आले नाही. त्यामुळे तूर्तास महापालिकेला आयुक्तच नसल्याचे चित्र आहे.
उपायुक्त अझीझ शेख ईदनिमित्त व उपायुक्त रवींद्र देवतळे रजेवर आहेत. आयुक्तांचा प्रभारी नाही व दोन उपायुक्त नाही. महापौर नंदा जिचकारही शहरात नाही. प्रशासन प्रमुख, शहराच्या प्रमुखही नसल्याने महापालिकेचा डोलारा केवळ अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे यांच्याकडे आहेत. ते दीर्घ अनुभव पणाला लावत महापालिका सांभाळत आहेत. परंतु, सरकारने आयुक्तांचा प्रभार दुसऱ्या अधिकाऱ्याकडे सोपविण्यात केलेल्या दिरंगाईमुळे प्रशासकीय कामात त्यांनाही अडथळे येत आहे. विविध विभागप्रमुखांनाही आयुक्त किंवा प्रभारी आयुक्त नसल्याने अडचणी येत आहेत. विकासकामे होत नसल्याने इतर पदाधिकारीही महापालिकेकडे फिरकत नसल्याचे चित्र आहे.
नव्या अतिरिक्त आयुक्तांची प्रतीक्षा
सध्या महापालिकेत अतिरिक्त आयुक्तांचा अतिरिक्त कार्यभार उपायुक्त अझीझ शेख यांच्याकडे दिला आहे. नुकतीच राज्य सरकारने अतिरिक्त विभागीय आयुक्त रवींद्र ठाकरे यांची महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती केली. मात्र, अद्याप त्यांनी कार्यभार स्वीकारला नाही. पुढील दोन दिवसांत ते पदभार स्वीकारण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

Web Title: Municipal corporation ram bharose