एलईडीने मनपाची तिजोरी प्रकाशमान ! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जून 2019

शहरातील सर्वच रस्ते रात्री एलईडी दिव्यांच्या प्रकाशाने उजळले असून यामुळे विजेच्या बिलातही महापालिकेला मोठा दिलासा मिळाला आहे. याप्रकल्पामुळे महापालिकेचे वर्षाला 38 कोटी रुपयांची बचत होत आहे.

नागपूर -  शहरातील सर्वच रस्ते रात्री एलईडी दिव्यांच्या प्रकाशाने उजळले असून यामुळे विजेच्या बिलातही महापालिकेला मोठा दिलासा मिळाला आहे. याप्रकल्पामुळे महापालिकेचे वर्षाला 38 कोटी रुपयांची बचत होत आहे. परिणामी महापालिकेच्या तिजोरीलाही चकाकी आल्याचे चित्र आहे. रात्री दहानंतर स्वयंचलित प्रणालीने एलईडी दिव्यांची तीव्रता कमी होत असल्याने दर महिन्याला 29 हजार युनिट विजेचीही बचत होत असून पर्यावरणाला पोषक वातावरणही तयार होत आहे. 

महापालिका व नागपूर स्मार्ट ऍण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेडने (एनएसएससीडीसीएल) संयुक्तपणे शहरातील जुने 1 लाख 43 हजार पथदिवे बदलून नवे एलईडी पथदिवे लावण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाने शहरातील रस्ते रात्रीला दुधाने न्हाऊन निघाल्याचे दिसून येत आहे. श्‍वेत प्रकाशाने संपूर्ण रस्ते उजळून निघाले असतानाच महापालिकेच्या तिजोरीला प्रकाशमान करणारे ठरले आहेत. महापालिका व एनएसएससीडीसीएलने आतापर्यंत मुख्य रस्ते, अंतर्गत वस्त्यांतील रस्त्यांवर 1 लाख 12 हजार एलईडी लाइट्‌स लावले. उर्वरित 31 हजार एलईडी लाइट्‌स पुढील काही आठवड्यात लावण्यात येणार आहेत. शहरातील रस्ते एलईडी लाइट्‌सने उजळले असताना महापालिकेला बचतीचा मोठा मार्गही सापडला. एलईडी लाइट्‌मुळे कधी काळी वर्षाला 53 कोटींचे विजेचे बिल भरणाऱ्या महापालिकेला आता केवळ 15 कोटी रुपयांपर्यंत वीजबिल भरावे लागत आहे. त्यामुळे वर्षाला 38 कोटींची बचत होत असून हाच पैसा शहराच्या विकासकामांसाठी वापरण्यात येत आहे. परिणामी प्रकाशमान रस्त्यांसह विकासालाही गती मिळत आहे. महापालिकेने वस्त्यांतील अंतर्गत रस्त्यांवर 36 वॉटचे तर मुख्य रस्त्यांवर 60, 105 वॉट व 120 वॉटचे एलईडी लाइट्‌स लावले आहेत. 

रात्री दहानंतर मंद प्रकाश 
या प्रकल्पाअंतर्गत रात्री दहानंतर एलईडी दिव्यांचा प्रकाश स्वयंचलित पद्धतीने मंद होत आहे. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत रात्री बारा वाजेपर्यंत 40 टक्के विजेची बचत होत असून सकाळी सहा वाजेपर्यंत 50 टक्के विजेचे बचत होत आहे. एलईडीमुळे पथदिव्यांसाठी खर्च होणाऱ्या युनिटमध्येही निम्म्याने घट झाली आहे. 

एलईडी लाइट्‌चे वीजबिल - 15 कोटी रुपये प्रतिवर्ष 
पारंपरिक पथदिव्यांचे वीजबिल - 53 कोटी रुपये प्रतिवर्ष 
एलईडी लाइट्‌सला लागणारी वीज - 32 हजार युनिट प्रतिमहिना 
पारंपरिक दिव्यांना लागणारी वीज - 61 हजार युनिट प्रतिमहिना 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal corporation Rs 38 crore savings