प्रेरणादायी! सर्वांची शाळा बंद, पण यांची सुरू, तंबूतील चिमुकल्यांची पुस्तकांशी गट्टी

Municipal Corporation started a school for nomadic children
Municipal Corporation started a school for nomadic children

चंद्रपूर  : पोटासाठी वणवण भटकायचे. रस्त्याच्या कडेला तंबू ठोकायचा. खेळणीची दुकाने लावायची. दिवसभर विक्री करायची. मिळालेल्या पैशात दोनवेळच्या जेवणाची सोय करायची. हा राजस्थानी कुटुंबीयांचा दिनक्रम. यामुळे त्यांच्या चिमुकल्यांनी कधी शाळेचा उंबरठाही ओलांडला नाही. अशा तब्बल 20 शाळाबाह्य मुलांसाठी महानगरपालिका धावून आली. रस्त्याच्या कडेला तंबूतच शाळा सुरू झाली. आता दररोज सकाळी दीड तास तंबुतील चिमुकले पुस्तकांशी मैत्री करू लागले आहेत. 

राजस्थानातील काही कुटुंबीय खेळणी विक्रीसाठी राज्यात येत असतात. एका शहरात काही दिवस दुकान थाटायचे. त्यानंतर दुसऱ्या शहरात जायचे. असा त्यांचा वर्षभराचा कार्यक्रम आखलेला असतो. असेच काही कुटुंब लॉकडाऊनच्या काळात चंद्रपुुरात आले. नागपूर मार्गावरील रस्त्याच्या कडेला तंबू ठोकून त्यांनी वास्तव्याची सोय केली. दिवसभर रस्त्याच्या कडेला खेळणीची दुकाने लावायची. विक्रीतून मिळणाऱ्या पैशात दोन वेळच्या जेवणाची सोय करायची, असा त्यांचा दिनक्रम ठरलेला आहे.

हेही वाचा - सालेकसातील शेतात आढळला मांजरीसारखा दिसणारा प्राणी; जवळ जाऊन बघितले असता अंगाचा उडाला थरकाप

पोटासाठी भटकंती करीत असताना कुटुंबातील चिमुकल्यांना शाळेत पाठविणे त्यांना शक्‍य होत नाही. त्यामुळे एकही मुलाने कधी शाळेचा उंबरठा ओलांडलेला नाही. याची खंतही त्यांच्या चेहऱ्यावर नाही. मनपाचे आयुक्त राजेश मोहिते यांना रस्त्याच्या कडेला खेळणी विक्री करणाऱ्या कुटुंबीयांची माहिती मिळाली. त्यानंतर या कुटुंबातील चिमुकल्यांच्या शिक्षणाचे काय, हा प्रश्‍न मोहिते यांना स्वस्थ बसू देत नव्हते. यातून मनपाचे शिक्षणाधिकारी नागेश नीत यांना तातडीने याबाबतची अधिक माहिती काढून चिमुकल्यांना तंबूतच शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याविषयीचा उपक्रम राबविण्याच्या सूचना दिल्या.

शिक्षणाधिकारी नीत यांनी पालावरील कुटुंबीयांची भेट घेत सहा ते 14 वयोगटातील बालकांची माहिती काढली. या बालकांना मनपा प्रशासनाकडून शिक्षणाची सुविधा दिली जाईल, असे सांगितले. आपण आयुष्यात शाळा बघितली नाही. मात्र, स्वत: मनपा आपल्या दारात मुलांसाठी शिक्षण देण्यासाठी येत असल्याने आनंद झाला. यातून संबंधित कुटुंबीयांनीही चिमुकल्यांच्या शिक्षणाला होकार दिला. मनपाने सर्व बालकांना पेन, त्यांच्या मातृभाषेतील पुस्तके, मास्क, कपडे दिले. 

या अभिनव उपक्रमासाठी सहा शिक्षकांची नियुक्ती केली. प्रत्येक दिवशी दोन शिक्षक सकाळी 8 ते 9.30 या वेळेत तंबूतच शाळा सुरू करून मुलांना अक्षर ओळख करून देऊ लागले आहेत. तंबूतील मुलेही नित्यनेमाने शाळेला उपस्थित राहत आहेत. शिक्षणाचा गंध नसलेल्या या कुटुंबातील चिमुकले मनपाच्या पुढाकारातून अक्षरांशी मैत्री करीत असल्याचे चित्र बघून त्यांच्या पालकांचे चेहरे आनंदी झाले आहेत. मात्र, पोटासाठी भटकंती करणे गरजेचे असल्याने 20 मुलांपासून सुरू झालेली शाळा आता 12 मुलांवर आली आहे. मनपाच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
 
 

सहा शिक्षकांची नियुक्ती
राजस्थानातील काही कुटुंबे खेळणी विक्रीसाठी शहरात आली. या कुटुंबातील सहा ते 14 वयोगटातील बालकांना शिक्षण देण्यासंबंधी मनपा आयुक्त राजेश मोहिते यांनी सूचना केल्या होत्या. त्यानुसार आजघडीला 12 मुलांना शिक्षण दिले जात आहे. त्यासाठी 6 शिक्षकांची नियुक्ती केली आहे.
- नागेश नीत,
शिक्षणाधिकारी, मनपा, चंद्रपूर.


 
अधिकाऱ्यांचे आभार
आम्ही कधी शाळेचा उंबरठा ओलांडला नाही. त्यामुळेच मुलांनाही शाळेत कधी पाठविले नाही. मात्र, आमच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी मनपाचे अधिकारी आमच्या तंबूत आले. ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. सर्व अधिकाऱ्यांचे आभार. 
- राजस्थानी कुटुंबीय.

संपादन : अतुल मांगे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com