महापालिकेला मिळणार 100 इलेक्‍ट्रिक बस

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

नागपूर ः सध्या पाच इलेक्‍ट्रिक बस महापालिकेत दाखल होण्याचा मार्ग मोकळा झाला. आता केंद्र सरकारच्या अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम विभागाने नागपूर शहरासाठी 100 इलेक्‍ट्रिक बसला मंजुरी दिली. त्यामुळे शहर बससेवा अत्याधुनिक होणार आहे. लवकरच इलेक्‍ट्रिक बसेस "आपली बस'च्या ताफ्यात दाखल होणार असून महापालिकेने चार्जिंग सेंटर वाढविण्यासाठीही प्रयत्न सुरू केले आहे.

नागपूर ः सध्या पाच इलेक्‍ट्रिक बस महापालिकेत दाखल होण्याचा मार्ग मोकळा झाला. आता केंद्र सरकारच्या अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम विभागाने नागपूर शहरासाठी 100 इलेक्‍ट्रिक बसला मंजुरी दिली. त्यामुळे शहर बससेवा अत्याधुनिक होणार आहे. लवकरच इलेक्‍ट्रिक बसेस "आपली बस'च्या ताफ्यात दाखल होणार असून महापालिकेने चार्जिंग सेंटर वाढविण्यासाठीही प्रयत्न सुरू केले आहे.
देशात इलेक्‍ट्रिक बस वाढविण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करीत आहे. अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम विभागाकडे 14 हजार 888 इलेक्‍ट्रिक बससाठी देशातील 85 शहरांचे प्रस्ताव आले होते. यातून 65 शहरांसाठी 5,095 बसेस देण्यासंदर्भात प्रकल्प अंमलबजावणी समितीने हिरवी झेंडी दाखविली. 400 इलेक्‍ट्रिक बस आंतरशहर बससेवेसाठी देण्यात येणार आहे. याशिवाय 100 इलेक्‍ट्रिक बस दिल्ली मेट्रोच्या फिडर सेवेसाठीही देण्यात येणार आहे. नागपूरला 100 इलेक्‍ट्रिक बस मिळणार आहे. याशिवाय पुण्याला 150, नवी मुंबईला 100, मुंबईतील बेस्टला 300, नाशिकला 50, सोलापूरला 25 बससेसाठी मंजुरी देण्यात आली. नागपूरनेही इलेक्‍ट्रिक बससाठी अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम विभागाकडे इलेक्‍ट्रिक बससाठी प्रस्ताव पाठविला होता. निवड झालेल्या प्रत्येक शहराला बस खरेदीसाठी टप्प्याटप्प्याने प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे. नागपूरसह पुणे, मुंबई, नवी मुंबई, पुणे, सोलापूर, नाशिक महापालिकेला राज्य परिवहन विभागाकडून इलेक्‍ट्रिक बस खरेदीसाठी प्रक्रिया करावी लागणार असल्याचे मनपातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने नमूद केले. नागपूर महापालिका या वर्षाच्या शेवटी ही प्रक्रिया सुरू करण्याची शक्‍यता या अधिकाऱ्याने व्यक्‍त केली.
मनपाला द्यावी लागणार 30 टक्के रक्कम
या बसेसच्या खरेदीसाठी 70 टक्के रकमेचे अनुदान मिळणार असून 30 टक्के रक्कम महापालिकेला द्यावी लागणार आहे. परंतु महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने प्रशासन सध्या शहर बस चालविणाऱ्या ऑपरेटरला बस खरेदीची जबाबदारी देणार आहे.
सहा इलेक्‍ट्रिक बस लवकरच
शहर बससेवेत सहा इलेक्‍ट्रिक बस लवकरच दाखल होणार आहेत. हैदराबाद स्थित ओलेक्‍ट्रा-बीवायडी ग्रीनटेक लिमिटेडने सहा 32 आसनी इलेक्‍ट्रिक बस तयार केल्या आहेत. लकडगंज येथील इलेक्‍ट्रिक चार्जिंग स्टेशनचे काम पूर्ण झाल्यानंतर या बसेस शहरात येतील.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal Corporation will get 100 electric buses