देवडिया सोडून दलवाई नेत्यांच्या घरी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जानेवारी 2017

नागपूर - मी कुठल्याही नेत्याची गाडी घेतली नाही आणि कोणाच्या घरी थांबलो नाही. तसेच यंदा नेत्यांच्या घरून नव्हे, तर देवडिया कॉंग्रेस भवनमधूनच उमेदवारी वाटप केली जाईल, असा दावा करणारे खासदार हुसेन दलवाई देवडिया सोडून नेत्यांच्या भेटीला त्यांच्या घरी गेले. त्यामुळे नागपूरमध्ये कॉंग्रेसपेक्षा नेत्यांनाच जास्त महत्त्व आहे हेच पुन्हा स्पष्ट झाले आहे.

नागपूर - मी कुठल्याही नेत्याची गाडी घेतली नाही आणि कोणाच्या घरी थांबलो नाही. तसेच यंदा नेत्यांच्या घरून नव्हे, तर देवडिया कॉंग्रेस भवनमधूनच उमेदवारी वाटप केली जाईल, असा दावा करणारे खासदार हुसेन दलवाई देवडिया सोडून नेत्यांच्या भेटीला त्यांच्या घरी गेले. त्यामुळे नागपूरमध्ये कॉंग्रेसपेक्षा नेत्यांनाच जास्त महत्त्व आहे हेच पुन्हा स्पष्ट झाले आहे.

महापालिकेची निवडणूक तोंडावर येऊन ठेपली असतानाही कॉंग्रेसमधील अंतर्गत वाद व मतभेद संपलेले नाही. माजी मंत्री नितीन राऊत, सतीश चतुर्वेदी तसेच अनीस अहमद यांनी देवडिया भवनकडे पाठ फिरविली आहे. विलास मुत्तेमवार-विकास ठाकरे दुसरीकडे चतुर्वेदी-राऊत, अहमद अशा दोन गटांत कॉंग्रेस विभाजित झाली आहे. तिन्ही नेत्यांच्या गटाने कॉंग्रेसच्या स्थापनादिन कार्यक्रमावरही अघोषित बहिष्कार टाकला होता. विशेष म्हणजे या कार्यक्रमास प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश उपस्थित होते.

हिवाळी अधिवेशनात युवक कॉंग्रेसचा मेळावा घेण्यात आला. राज्यातील बड्या नेत्यांना बोलाविण्यात आले; मात्र शहराचे अध्यक्ष विकास ठाकरे यांना वगळण्यात आले. त्यांचे नावही निमंत्रण पत्रिकेत छापण्यात आले नव्हते. महापालिकेच्या निवडणुकीत अंतर्गत मतभेदाचा फटका कॉंग्रेसला बसू शकतो. यामुळे नेत्यांची दिलजमाई करण्यासाठी प्रदेश कॉंग्रेसने प्रतिनिधी म्हणून हुसेन दलवाई यांना नागपूरला पाठविले.

शनिवारी त्यांनी देवडिया भवन येथे विलास मुत्तेमवार, नितीन राऊत, अनीस अहमद, विकास ठाकरे, अभिजित वंजारी, प्रफुल्ल गुडधे आदी नेत्यांच्या भेटी घेतल्या. सर्वांना फोन करून बोलावले होते. मात्र, सतीश चतुर्वेदी यांनी भेटण्यास टाळले. नितीन राऊत उशिरा रात्री भेटले. या वेळी पत्रकारांसोबत बोलताना दलवाई यांनी कोणाच्या घरी जाणार नाही, तर सर्वांना देवडियात बोलावल्याचे सांगितले. मात्र, दुसऱ्याच दिवशी ते अनेक नेत्यांच्या घरी गेले. यात सतीश चतुर्वेदी यांचाही समावेश आहे.

चतुर्वेदी, राऊत गटाची ताठर भूमिका
नागपूरचे नेते कुणालाच जुमानत नसल्याचे दिसतात त्यांनी शहरातून काढता पाय घेतल्याची चर्चा कॉंग्रेसच्या वतुर्ळात आहे. महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांची नावे निश्‍चित करताना विश्‍वासात द्यावे, अशी अट चतुर्वेदी व राऊत यांनी टाकली आहे. चतुर्वेदी व राऊत गटाची ताठर भूमिका पाहता, ही अट कितपत मान्य केली जाईल, हे तिकीट वाटपानंतरच स्पष्ट होणार आहे.

Web Title: municipal election issue