गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणात मनपाचे अडथळे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 सप्टेंबर 2018

गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणात मनपाचे अडथळे
नागपूर : चार दिवसांपासून बंद असलेल्या शहर बसबाबत रात्री ऑपरेटर, पदाधिकारी व अधिकाऱ्यांत झालेल्या चर्चेनंतर तोडगा निघाला असून उद्या सकाळपासून बससेवा पूर्ववत सुरू होईल. मात्र, आज शहर बसची मासिक पास काढून शाळेत जाणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणात महापालिकेने अडथळे निर्माण केल्याचे चित्र निर्माण झाले. ठिकठिकाणी बसथांब्यावर बसच्या प्रतीक्षेतील अनेक पासधारक विद्यार्थ्यांना पैशाअभावी घरी परतावे लागले. या विद्यार्थ्यांचा शनिवार, सोमवार आणि आज मंगळवार, असे सलग तीन दिवसांचा अभ्यास बुडाला.

थकीत रकमेसाठी शहर बस संचालन करणारे तिन्ही ऑपरेटर अडून बसले असून प्रशासन, पदाधिकाऱ्यांत अनेक बैठका झाल्या; परंतु चौथ्या दिवशी दिवसभरात तोडगा निघाला नाही. ऑपरेटरने शहर बससेवा बंद केल्याने पासधारक विद्यार्थी भरडले गेले. अनेक पालकांनी पोटाला चिमटा देत विद्यार्थ्यांच्या पाससाठी शहर बसकडे पैसे भरले. मात्र, शनिवारपासून बस बंद असल्याने विद्यार्थ्यांचा अभ्यास बुडत असल्याने पालकांनीही आज रोष व्यक्त केला. पासधारक मुले बसथांब्यावर गेले, काही वेळाच्या प्रतीक्षेनंतर घरी परतले. याशिवाय चाकरमान्यांनाही सलग चौथ्या दिवशी मनस्ताप सहन करावा लागत असून "हेच का अच्छे दिन' असा सवाल उपस्थित केला; मात्र आज रात्री सत्तापक्ष नेते संदीप जोशी, परिवहन समिती सभापती बंटी कुकडे, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी अथक प्रयत्नांनंतर ऑपरेटरची समजूत काढली. त्यांना तत्काळ प्रत्येकी दोन कोटी व तीन-चार दिवसांच्या अंतराने टप्प्या-टप्प्यात प्रत्येकी 50 लाख देण्याचा निर्णय झाला.
ऑटोचालकांकडून दुप्पट दर
शहर बस बंद असल्याने ऑटोचालकांनी शहरवासींकडून दुप्पट दर वसूल करणे सुरू केले आहे. महापालिकेच्या बसथांब्यांवर ऑटोंच्या रांगा दिसून येत असून प्रवाशांनाही पर्याय नसल्याने ऑटोचालकांच्या मनमानीपुढे लोटांगण घालावे लागत आहे.
आता कुठे गेले सीएम?
यापूर्वी चालकांनी संप पुकारला होता, त्यावेळी पदाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून मुख्यमंत्र्यांनी "एस्मा' लावला होता. जनतेचे चार दिवसांपासून हाल सुरू आहेत, आता कुठे गेले मुख्यमंत्री? असा सवाल विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी केला.
चालक, वाहक बससेवा सुरू करणार
पालिका प्रशासन बससेवा सुरू करू शकले नाही तर उद्या, 26 सप्टेंबरला सकाळपासून वाहक, चालक स्वखर्चाने बससेवा सुरू करणार, असे पत्र आज भारतीय कामगार सेनेचे बंडू तळवेकर यांनी महापौरांना दिले.
परवानाधारक बस असोसिएशनही तयार
पालिकेने नियुक्त केलेल्या ऑपरेटरमुळे आतापर्यंत अनेकदा बससेवा ठप्प झाली. महापालिकेने नागपूर महानगर परवानाधारक बस असोसिएशनला बस चालविण्यास द्यावी, अशी मागणी आज पत्रकार परिषदेत असोसिएशनचे सचिव शैलेश पांडे यांनी केली.

सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांच्या पुढाकाराने सकारात्मक चर्चा झाली असून तिन्ही ऑपरेटरला प्रत्येकी दोन कोटी तत्काळ व त्यानंतर 29 तारखेला, 3 ऑक्‍टोबरला, 9 ऑक्‍टोबरला प्रत्येकी 50 लाख रुपये देण्यात येतील. उद्या, सकाळपासून बससेवा सुरू होईल.
- बंटी कुकडे, सभापती, परिवहन समिती.

Web Title: Municipal obstacles in the education of poor students