मनपा मालमत्ताधारकांवर गुन्हे दाखल करणार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 मार्च 2017

नागपूर -  राज्य शासनाने महापालिकांना मालमत्ता कर वसुलीसाठी कडक पावले उचलण्याचे निर्देश दिलेत. त्यामुळे महापालिकेनेही मालमत्ता कर वसुलीसाठी आता कंबर कसली असून, धनादेश न वटलेल्या मालमत्ताधारकांना लक्ष्य करण्यात येणार आहे. मालमत्ता करासाठी धनादेश देणाऱ्यांपैकी 460 जणांचे धनादेश वटले नाहीत. या मालमत्ताधारकांकडून तत्काळ कर वसूल करा, अन्यथा त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाने सहायक आयुक्तांना दिले आहेत. 

राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने बुधवारी सर्व महापालिकांना मालमत्ता व पाणी कराची 100 टक्के वसुली करण्याचे निर्देश दिले. यासाठी विशेष मोहीम राबविण्याचेही महापालिकांना सांगितले. राज्य शासनाने यासाठी महापालिकांना कार्यक्रमही दिला आहे. राज्य शासनाच्या सक्तीमुळे महापालिकेनेही मालमत्ता कर वसुलीसाठी अधिकाऱ्यांना "टार्गेट' दिले. मागील वर्षीच्या तुलनेत प्रत्येकाने 10 टक्के जास्त वसुली करावी, असे निर्देश प्रशासनाने सहायक आयुक्तांना दिले आहेत. यात विशेष म्हणजे मालमत्ता करासाठी महापालिकेला धनादेश देऊन ते न वटल्याप्रकरणी कठोर होण्याचेही निर्देश प्रशासनाने अधिकाऱ्यांना दिले आहे. एवढेच नव्हे सर्व झोन कार्यालयांमध्ये मालमत्ता व पाणी कराच्या वसुलीसाठी सकाळी आठ वाजेपासून काउंटर सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सुटीच्या दिवशी रविवारीही काउंटर सुरू ठेवण्यात येणार आहे. मालमत्ता कराचे टार्गेट पूर्ण न केल्यास अधिकाऱ्यांनाही कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. अनेक वर्षांपासून थकीत मालमत्ता करासाठी मालमत्ता जप्ती करण्यासाठीही महापालिका पावले उचलणार आहे. 

मागील वर्षीच्या तुलनेत घसरण 
मागील वर्षी 2 मार्चपर्यंत 134.99 कोटी रुपयांचा मालमत्ता कर महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला होता. मात्र, यावर्षी 128.53 कोटी रुपये मालमत्ता कर गोळा करण्यात आला. अर्थातच यासाठी नुकताच झालेल्या महापालिका निवडणुकीचाही परिणाम झाला. मागील वर्षीच्या तुलनेत मालमत्ता करात सहा कोटींची घट झाली आहे. 

महिनाभरात पावणेदोनशे कोटींचे आव्हान 
महापालिकेने यावर्षी मालमत्ता कराच्या वसुलीचे 300 कोटींचे लक्ष्य ठेवले आहे. दोन मार्चपर्यंत महापालिकेने 128.53 कोटी वसूल केले. त्यामुळे आता 31 मार्चपर्यंत पावणेदोनशे कोटी वसूल करण्याचे आव्हान अधिकाऱ्यांपुढे आहे. 

Web Title: Municipal property holders will be admitted to the crime