मनपा विज्ञान शिक्षिकांची "लॅब इन कॅरिबॅग' 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

नागपूर - महापालिकेच्या शाळा आणि या शाळांमधील शिक्षकांकडे बघण्याचा एक संकुचित दृष्टिकोन समाजाचा तयार झाला आहे. पण, अतिशय मोजक्‍या सोयीसुविधांमध्ये आपल्या कामगिरीचा ठसा या शाळांनी उमटवलाच आहे. महापालिकेच्या शाळांमधील ज्योती मेडपलीवार, दीप्ती बिश्‍त आणि पुष्पलता गावंडे या तीन शिक्षिकांनी अलीकडेच राज्यभरातील चारशे शिक्षकांना विज्ञान विषय शिकविण्याचे धडे दिले आणि एक नवा आदर्श घातला. 

नागपूर - महापालिकेच्या शाळा आणि या शाळांमधील शिक्षकांकडे बघण्याचा एक संकुचित दृष्टिकोन समाजाचा तयार झाला आहे. पण, अतिशय मोजक्‍या सोयीसुविधांमध्ये आपल्या कामगिरीचा ठसा या शाळांनी उमटवलाच आहे. महापालिकेच्या शाळांमधील ज्योती मेडपलीवार, दीप्ती बिश्‍त आणि पुष्पलता गावंडे या तीन शिक्षिकांनी अलीकडेच राज्यभरातील चारशे शिक्षकांना विज्ञान विषय शिकविण्याचे धडे दिले आणि एक नवा आदर्श घातला. 

दुर्गानगर शाळेतील ज्योती मेडपलीवार, नेताजी मार्केट शाळेतील दीप्ती बिश्‍त आणि वाल्मीकीनगर शाळेतील पुष्पलता गावंडे या तीन विज्ञान शिक्षिका. गेल्या पंधरा वर्षांपासून अपूर्व विज्ञान मेळ्याचे जनक सुरेश अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात नैसर्गिक आणि उपलब्ध साधनांतून विज्ञानाचे प्रयोग साकारण्याचे धडे तिघींनी घेतले. महापालिकेच्या शाळेतील शेवटच्या विद्यार्थ्याला समजेल, अशा सोप्या भाषेत आणि साध्या प्रयोगांमधून विज्ञान शिकविण्याचा विडा या शिक्षिकांनी उचलला. "प्रयोग'निष्ठ विज्ञान शिकविण्याच्या पद्धतीला फाटा देत "विज्ञान'निष्ठ प्रयोगांवर भर देण्याची तिघींची तऱ्हा झपाट्याने लोकप्रिय झाली आणि अनेक कार्यशाळांसाठी त्यांना निमंत्रित करण्यात आले. टप्प्याटप्प्याने संधी मिळत असतानाच राज्य पाठ्य पुस्तक मंडळावर सदस्य म्हणूनही तिघींची निवड झाली. ही बाब केवळ महापालिकेसाठी नव्हे, तर नागपुरातील एकूणच शिक्षण क्षेत्रासाठी कौतुकास्पद ठरते. 

दरम्यान, राज्य शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी तिघींच्याही अफलातून विज्ञान प्रयोगांचा अनुभव घेतला आणि राज्यभरातील शिक्षकांना याचे प्रशिक्षण मिळायला हवे, अशी कल्पना मांडली. विशेष म्हणजे "लॅब इन कॅरिबॅग' ही संकल्पना त्यांना विशेषत्वाने प्रभावित करून गेली. त्यानुसार पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेतर्फे गेल्या महिन्यात ज्योती मेडपलीवार, दीप्ती बिश्‍त आणि पुष्पलता गावंडे यांना आमंत्रित केले. राज्यभरातील साडेपंधरा हजार विज्ञान शिक्षकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या चारशे शिक्षकांना "लॅब इन कॅरिबॅग' या संकल्पनेवर आधारित विज्ञान अध्यापनाचे धडे दिले. आहे त्या साधनांमधून विज्ञानाचे अवघड प्रयोग साध्य करणे बघायला जेवढे सोपे, तेवढेच ते आत्मसात करायला अवघड आहे. सोप्या मार्गाने जाण्यासाठीदेखील तपश्‍चर्येची गरज असते, हेदेखील तिघींनी सिद्ध करून दिले. 

बाबूजी अग्रवाल आमचे गुरू आहेत. त्यांच्याच तालमीत तयार झालो. आता महापालिकेच्या शिक्षकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा, यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत. 

- ज्योती मेडपलीवार, विज्ञान शिक्षिका, दुर्गानगर शाळा 

Web Title: Municipal Science teachers