मनपा संकेतस्थळावर मतदारयादीचा घोळ कायम

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जानेवारी 2017

नागपूर - महापालिकेच्या संकेतस्थळावर अंतिम मतदारयादी "अपलोड' केल्याचा दावा अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. मात्र, संकेतस्थळावर दहा प्रभागांच्या मतदारयादीवर "क्‍लिक' केल्यास "फाईल नॉट फाउंड' असा संदेश येत आहे. त्यामुळे अनेकांना मतदारयादी "डाउनलोड' करणे अशक्‍य झाले असून, अत्याधुनिक यंत्रणेचे बारा वाजल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

महापालिकेने काल, रविवारी www.nmcelection2017.org या संकेतस्थळावर 33 प्रभागांची अंतिम मतदारयादी प्रकाशित केली होती. यातीलही सात प्रभागाची अंतिम मतदारयादी ओपन होत नसल्याबाबत तसेच पाच प्रभागांची मतदारयादी अपलोड केली नसल्याने अनेकांची निराशा झाल्याबाबत "सकाळ'ने आज वृत्त प्रकाशित केले होते.

महापालिकेने आज शिल्लक पाच प्रभागाची मतदारयादी संकेतस्थळावर "अपलोड' केली. परंतु, या पाचपैकी तीन प्रभागांची मतदारयादी "ओपन' होत नसल्याचे चित्र आहे. 36, 37 व 38 या प्रभागांतील मतदारयादीवर "क्‍लिक' केल्यास 'file or directory not found' असा संदेश पुढे येत आहे. याशिवाय कालपासून 7, 9, 12, 13, 16, 17, 33 या प्रभागांची अंतिम मतदारयादीही नागरिकांना बघणे अशक्‍य झाले आहे. सध्या राजकीय पक्षांना अंतिम मतदारयादीची गरज आहे. राजकीय पक्ष महापालिकेच्या संकेतस्थळावरून अंतिम मतदारयादी "डाउनलोड' करून आपली कामे करीत आहेत. याशिवाय नवमतदारांनाही मतदारयादीत नावांचा समावेश झाला की नाही, याबाबत उत्सुकता आहे. परंतु, महापालिकेची अत्याधुनिक संगणकीय प्रणालीचे बारा वाजल्याने अनेकांच्या उत्सुकतेवर पाणी फेरल्या गेले आहे. कालपासून संकेतस्थळावर प्रभागाची यादी "अपलोड' करूनही ती बघायला मिळत नसल्याने अनेकांनी महापालिकेच्या अत्याधुनिक संगणकीय यंत्रणेवर संताप व्यक्त केला आहे.

Web Title: municipal website voting list scam