सुसाट गाडी चालवतो म्हणून दगडाने ठेचून खून

सुसाट गाडी चालवतो  म्हणून दगडाने ठेचून खून
नागपूर : वस्तीतून सुसाट वाहन चालविणे एका युवकाच्या जिवावर बेतले. नालंदा वस्तीतील पाच जणांनी भरचौकात दुचाकीस्वार युवकाचा रॉड आणि दगडाने ठेचून खून केला. ही थरारक घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. आशीष नामदेव देशपांडे (वय 32, नालंदा चौक) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या हत्याकांडात शांतीनगर पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली तर एक आरोपी अद्याप फरार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास आशीष देशपांडे हा वस्तीतून भरधाव दुचाकी चालवीत होता. विनाकारण हॉर्न वाजवीत रस्त्यावर बसलेल्या महिलांना त्रास देत होता. हॉर्न वाजविणाऱ्या आशीषला घरासमोर बसलेल्या एका महिलेने हटकले. "तू एवढ्या वेगात वाहन चालवू नको, रस्त्यावर मुले खेळत आहेत तसेच आम्हाला पण हॉर्नचा त्रास होतो,' अशी समज दिली. मात्र, आशीषने त्या महिलेला अश्‍लील शिवीगाळ केली आणि "परत आल्यावर तुला दाखवतो' असे बोलून भरधाव निघून गेला. ही बाब महिलेने वस्तीतील आरोपी युवक निखिल मेश्राम, निखिल हांडा, आशू मेश्राम, आदर्श गोखे, रॉकी मेश्राम यांना सांगितली. रात्री अकरा वाजता आशीष हा पुन्हा दुचाकी घेऊन रस्त्यावरून हॉर्न वाजवीत जात होता. त्याला आरोपींनी अडविले. त्याची समजूत घालत असताना आशीषने आरोपींना शिवीगाळ केली. त्यामुळे चिडलेल्या आरोपींनी रॉड, काठी आणि दगडांनी ठेचून आशीषचा खून केला. घटनेची माहिती मिळताच शांतीनगरचे ठाणेदार कवडू उईके हे पथकासह घटनास्थळावर पोहोचले. त्यांनी आशीषचा मृतदेह ताब्यात घेऊन मेयोत रवाना केला. या प्रकरणी अपर्णा देशपांडे यांच्या तक्रारीवरून सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी बारा तासांच्या आत पाच आरोपींना अटक केली. तर निखिल हांडा अद्याप फरार आहे.
नागरिकांनी दिली होती समज
गेल्या काही दिवसांपासून आशीषमुळे वस्तीतील नागरिक त्रस्त होते. त्यामुळे काही नागरिकांनी आशीषला समज दिली होती. मात्र, आशीषने पुन्हा दुचाकी वेगात चालविणे आणि विनाकारण हॉर्न वाजविणे सुरूच ठेवले. त्यामुळे समज दिल्यानंतरही हा प्रकार सुरू असल्यामुळे आशीषचा खून झाला.
आशीषवर पाच गुन्हे
आशीष हा वेल्डिंगची कामे करीत होता. 1998 पासून तो गुन्हेगारीत सक्रिय होता. आशीषवर आतापर्यंत कळमना पोलिस ठाण्यात 7 गुन्हे दाखल आहेत. यामध्ये शस्त्र वापरणे, हाणामारी करणे, दादागिरी करणे अशा गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. पोलिसांनी आशीषला यापूर्वी समज दिल्याची माहिती आहे.
विलक्षण योगायोग
आशीष देशपांडेचा वस्तीतील अनेकांना त्रास होता. संपूर्ण वस्ती त्याच्या त्रासाला कंटाळली होती. त्यामुळे वस्तीतील नागरिकांनी आशीषची हत्या केली, अशी चर्चा दिवसभर होती. मात्र, या हत्याकांडात सहा आरोपींवर गुन्हा दाखल आहे. 13 ऑगस्ट 2004 ला कुख्यात गुंड अक्‍कू यादवचा नागरिकांनी ठेचून खून केला होता. दीड दशकानंतर आशीष देशपांडेचा याच दिवशी अक्‍कू यादव केल्याची चर्चा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com