सफाई कर्मचाऱ्याला भोसकले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 सप्टेंबर 2019

कामठी : जुनी कामठी पोलिस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावरील जुनी ओली दिवाण मंदिरासमोर कामठी नगर परिषदेच्या सफाई कर्मचाऱ्याचा शनिवारी सकाळी सहाला खून करण्यात आला. सतीश किशोर धामती (वय 28, रा. कोळसा टाल, कामठी) असे मृताचे नाव आहे. घटनेचे कारण कळले नसून जुन्या वैमनस्यातून त्याचा खून झाल्याची चर्चा आहे.

सतीशचे एक महिन्यापूर्वी नागपूर मार्गावरील भाटिया लॉनमध्ये भांडण झाले होते. या भांडणाचा वचपा काढण्याच्या उद्देशातून खून झाल्याचे तर्क लावण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी सहाला दिवाण मंदिराजवळ सफाईचे काम करताना हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने सतीशला भोसकले. यानंतर त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच जुनी कामठी पोलिसांनी सतीशला कामठी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. त्याला पुढील उपचारार्थ आशा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, त्याचा उपचारात मृत्यू झाला. मृत्यूपूर्व सतीशने आरोपीचे नाव सांगितल्याची चर्चा आहे. या प्रकरणी जुनी कामठी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: murder