अकोल्यातील शासकीय कार्यालयात हत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 मे 2019

अकोला मुर्तिजापूर मार्गावरील जिल्हा उपनिबंधक कार्यालयात किसनराव हुंडीवाले आपल्या काही कामानिमित्ताने आले होते. दरम्यान काही हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला चढविला. 

अकोला: खासगी संस्थेच्या कार्यकारिणीच्या वादातून चक्क धर्मदाय आयुक्त कार्यालयातच किसनराव हुंडीवाले यांची हत्या झाली. या घटनेने अकोला व परिसरात एकच खळबळ उडाली असून अकोल्याच्या पहिल्या महापौर सुमनताई गावंडे यांचे पती श्रीराम गावंडे, मुलगा छोटू उर्फ विक्रम गावंडे व इतर प्रवीण गावंडे आणि रणजीत गावंडे यांच्या शोधासाठी पोलिसांची विविध पथके रवाना झालेली आहेत.

अकोला मुर्तिजापूर मार्गावरील धर्मदाय आयुक्त कार्यालयात सकाळी ही खळबळजनक घटना घडली. यात किसनराव हुंडीवाले यांच्यासोबतचा वकीलही गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. किसनराव हुंडीवाले प्रॉपर्टी व्यवसायासह राजकीय क्षेत्रातील मोठे नाव होते. धर्मदाय आयुक्त कार्यालयात आपल्या कामानिमित्त उपस्थित असताना हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्यावर अग्नीशमनसाठीचे छोटे सिलेंडर मारले. हा मार इतका जोरदार होता की हुंडीवाले यांचा जागेवरच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरुन फरार झाले. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख, शहर उपविभागीय अधिकारी उमेश माने पाटील, सिव्हील लाईन्सचे ठाणेदार विनोद ठाकरे, एलसीबी प्रमुख पोलिस निरीक्षक कैलास नागरे, खदान ठाणेदार हरिष गवळी घटनास्थळावर पोहोचले. प्राथमिक माहितीनुसार हुंडीवाले यांचा एका संस्थेतील कार्यरिणीवरून वाद सुरू होता.

सोमवारी धर्मदाय कार्यालयात तारीख होती. त्यासाठी दोन्ही पक्ष हजर झाले होते. विवादाचे रुपांतर शेवटी हत्येमध्ये झाले. या प्रकरणातील आरोपी अकोल्याच्या पहिल्या महापौर सुमनताई गावंडे यांचे पती श्रीराम गावंडे, मुलगा छोटू उर्फ विक्रम गावंडे व इतर प्रवीण गावंडे आणि रणजीत गावंडे यांच्या शोधासाठी पोलिसांची विविध पथके रवाना झालेली आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: murder in akola due to property disputes