दोन हत्याकांडांनी उपराजधानी हादरली

Murder
Murder

नागपूर - एकाच दिवसात दोन थरारक हत्याकांड घडल्याने उपराजधानी हादरली. लोकसभा निवडणूक तोंडावर असताना उपराजधानीत गुंडांनी हैदोस घातल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  

गणेशपेठ पोलिस ठाण्यांतर्गत होळीच्या रात्रीला एकेकाळचा कुख्यात गुंड अविनाश सीताराम ढेंगे (६०, रा. कर्नलबाग) हा होळीच्या रात्रीला मधुकर तुकाराम शेंडे (५१, रा. राजाबाक्षा) आणि अमोल ऊर्फ भुऱ्या खरसडे (२३, रा. पारडी) यांच्यासोबत बसले होते. रात्री एकच्या सुमारास अविनाशने भुऱ्याला दारू पिण्याकरिता पैसे मागितले. त्याने पैसे देण्यास नकार दिला असता, अविनाशने शिवीगाळ केली. या रागातून भुऱ्याने अविनाशला मारहाण केली व जमिनीवर ढकलले. सिमेंट रस्त्यावर पाठीमागून डोके आपटल्याने तो निपचित पडला. भुऱ्या घाबरून पळाला. तर शेंडे याने पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. पोलिस घटनास्थळी पोहोचताच शेंडे हा घटनास्थळावरून निघून गेला. मृताच्या शवविच्छेदन अहवालानुसार डोक्‍याला जखम झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री प्रकरणात खुनाच्या गुन्ह्याचे कलम वाढवून आरोपी अमोल याला अटक केली. अविनाश हा कुख्यात असून एकेकाळी त्याच्या नावाची परिसरात दशहत होती, हे विशेष.

दुसरी घटना अजनी पोलिस ठाण्यांतर्गत शुक्रवारी मध्यरात्री घडली. बुद्धराम ऊर्फ कालू कैतवास (५०, रा. फुलमती ले-आउट, अजनी असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी बादल वसंत प्रधान (२४) आणि प्रशील सुरेश डुकरे (२८, दोन्ही रा. फुलमती ले-आउट, अजनी) अशी आरोपींची नावे असून त्यांना गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली. आरोपी हे ऑटोचालक आहेत. फुलमती ले-आउटमधील ३६-आर भूखंड मोकळे होते. कालू व आरोपींनी त्या ठिकाणी अतिक्रमण करून झोपड्या उभारल्या होत्या. बुद्धराम याची पहिली पत्नी त्याला सोडून गेली आहे. ५० वर्षीय कालूने २० वर्षीय प्रीती नावाच्या तरुणीशी विवाह केला. प्रीती ही कधी माहेरी तर कधी पतीकडे राहत होती. बुद्धराम हा भूखंड विक्रीसाठी दलाली करायचा. काही महिन्यांपूर्वी त्याने एक ऑटो विकत घेतला होता. शुक्रवारी संध्याकाळी बादल याने पत्नीला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी ऑटो मागितला. रात्री आठपर्यंत तो ऑटो घेऊन न परतल्याने कालूने त्याला फोनवरून शिवीगाळ केली. त्याचा त्याला राग आला. त्याने प्रशीलशी संगनमत करून रात्री बाराच्या सुमारास बुद्धराम झोपला असता उशीने तोंड दाबून भाजी कापण्याच्या चाकूने गळा चिरला. त्यानंतर मृतदेहाच्या पायाला मोठा दगड बांधून विहिरीत फेकला. काही अंतरावर बुद्धरामची सासुरवाडी असून पत्नीच्या भावाची प्रकृती बिघडल्याने ती ऑटो घेण्यासाठी पहाटे तीनला पतीच्या घरी आली. त्यावेळी घरात रक्त सांडलेले होते व पती घरी नव्हता. त्यामुळे तिने पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून गुन्हा दाखल केला व अवघ्या काही तासांत गुन्हे शाखेच्या परिमंडळ ४ चे पोलिस निरीक्षक सत्यवान माने, सहायक निरीक्षक दिलीप चंदन, किरण चौगले, पुरुषोत्तम मोहेकर, बट्टूलाल पांडे या पथकाने आरोपींना अटक केली, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त नीलेश भरणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

असा लागला छडा
या खुनाच्या घटनेत पोलिसांकडे कुणीच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता. पण, बुद्धरामच्या शेजारी झोपडीत राहणारे दोघेही जण बेपत्ता होते. पत्नीने त्या ठिकाणी कोण राहतात, याची माहिती घेतली. त्यानंतर त्यांना वेगवेगळ्या ठिकाणांहून अटक करण्यात आली. 

अजनी पोलिसांच्या आशीर्वादाने जुगारअड्डा? 
अजनी पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादाने ते तिघे जुगारअड्डा चालवत होते, अशी माहिती समोर येत आहे. जुगारातील पैशाच्या वादातून तिघांमध्ये बिनसले होते. त्यावरून बुद्धराम याचा खून करण्यात आल्याचे सांगण्यात येते. यासंदर्भात डीसीपी भरणे यांना पत्रकार परिषदेत विचारले असता त्यांनी जुगारअड्ड्यासंदर्भात माहिती नाही. पण, बुद्धराम याच्या घरातून जुगारात वापरावयाचे पत्ते (कॅट) सापडले आहेत. जुगारासंदर्भातील माहितीची शहानिशा करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com