बेला येथील गुन्हेगार युवकाचा खून

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

भंडारा : दोन खुनाचे गुन्हे असलेला बेला येथील सतीश उर्फ पोयटा बागडे (वय 18) याचा खून करण्यात आल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले. यातील चार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, आणखी काही जणांचा यात सहभाग असल्याचा पोलिसांचा कयास आहे.

भंडारा : दोन खुनाचे गुन्हे असलेला बेला येथील सतीश उर्फ पोयटा बागडे (वय 18) याचा खून करण्यात आल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले. यातील चार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, आणखी काही जणांचा यात सहभाग असल्याचा पोलिसांचा कयास आहे.
गांधी वॉर्ड बेला येथील सतीश बागडे रविवारी सकाळी घराजवळील तलावाकडे गेला. परंतु, नंतर घरी परत आलाच नाही. त्यामुळे त्याच्या आईने भारती बागडे यांनी भंडारा पोलिस ठाण्यात तक्रार केली. सतीशवर आधीच खुनाचे दोन गुन्हे नोंदवले असल्यामुळे पोलिसांनी घातपाताचा संशयातून त्याचा शोध सुरू केला. वेगवेगळ्या पथकांनी घटनास्थळाची पाहणी केली असता तलावाजवळ रक्ताचे डाग आढळले. त्यामुळे परिसरात कसून तपास सुरू केला. पोलिसांनी संपूर्ण रात्रभर तपास केला. परंतु, मृतदेह आढळला नाही. तेव्हा स्थानिक नागरिकांच्या मदतीने तलावात शोध घेतला. त्यानंतर सतीश उर्फ पोयटा याचा मृतदेह आढळून आला.
त्याच्या मानेवर, चेहऱ्यावर व गळ्यावर धारदार शस्त्राच्या अनेक जखमी असून, त्याचा गळा कापून खून केला व नंतर मृतदेह तलावात फेकून दिल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणाच्या तपासात जुन्या भांडणातून सतीशचा खून केल्याचा अंदाज असून, चार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांची विचारपूस केल्यावर आणखी काही जणांना ताब्यात घेतले जाईल, असे तपासी अधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी रीना जनबंधू, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र मानकर, पोलिस निरीक्षक सुधाकर चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक अमोल पुरी, सुनील उईके यांनी खुनाचा तपास केला.

बेला येथील प्रकरणात मृत सतीश उर्फ पोयटा भिवा बागडे याच्या विरुद्ध भंडारा पोलिस ठाण्यात दोन खुनाचे गुन्हे नोंद आहेत. त्याचा खून कोणत्या कारणावरून केला याबाबत सखोल तपास सुरू आहे. या गुन्ह्यातील उर्वरित आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल. स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या बुद्धीकौशल्यामुळे या प्रकरणाचा उलगडा केला आहे.
-अरविंद साळवे

पोलिस अधीक्षक भंडारा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murder of a criminal youth in Bella