रेल्वेत दिव्यांग अभियंत्याचा खून

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

अमरावती : शिर्डी ते पुरी या रेल्वेगाडीमध्ये उत्तर प्रदेश येथील एका दिव्यांग अभियंत्याचा गळा आवळून खून केल्याची घटना बुधवारी (ता. 11) उघडकीस आली. बडनेरा (जीआरपी) पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. विशेषकुमार शिरपाल (वय 30, रा. नेहदरा, उत्तर प्रदेश) असे मृत अभियंत्याचे नाव आहे.

सोमवारी (ता. नऊ) बडनेरा रेल्वेस्थानकावर रेल्वेगाडी थांबली तेव्हा गाडीच्या दिव्यांग व्यक्तीसाठी राखीव असलेल्या डब्यात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. रेल्वेतील सुरक्षारक्षकाने घटनेसंदर्भातील माहिती बडनेरा स्टेशनमास्तर व त्यानंतर जीआरपी पोलिसांना दिली. प्रथमदर्शनी अकस्मात मृत्यू, अशी नोंद घेऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात ठेवला. या व्यक्तीजवळ एक मोबाईल सापडला. त्यात काही नंबर होते.
शिवाय मनमाड ते पुरी, अशी रेल्वेप्रवासी एक तिकीट आढळली. पोलिसांनी मोबाईलवरून नातेवाइकाचा शोध घेतला. त्यानंतर मृत व्यक्ती विशेषकुमार शिरपाल असल्याची खात्री पटली. प्राथमिक शवविच्छेदन अहवाल जीआरपी, बडनेरा पोलिसांना प्राप्त झाला. त्यात दिव्यांगांच्या राखीव डब्यात आढळलेल्या युवकाचा गळा आवळून खून केल्याची बाब उघडकीस आली. शिरपाल हा बीटेक शिक्षित असून, बेलापूर येथील एका इलेक्‍ट्रॉनिक्‍स कंपनीत नोकरीला होता, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
प्रकरण अकोला पोलिसांकडे वळविले
रेल्वेतील सुरक्षारक्षकाला दिव्यांगांच्या डब्यात अकोला येथे असतानाच मृतदेह दृष्टीस पडला होता. परंतु, बडनेरा जीआरपी पोलिसांना त्याची प्राथमिक माहिती मिळाली. येथे गुन्हा दाखल करून प्रकरण पुढील तपासासाठी अकोला (जीआरपी) पोलिसांकडे वळते करण्यात आले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murder of a disabled engineer on a train