कामठीत भरदिवसा तरुणाचा खून

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

कामठी: वडिलांना सोडून घरी परतणाऱ्या तरुणावर चाकूने गळा व पोटावर सोळा वार करून खून करण्यात आला. ही घटना कामठी येथील समतानगर परिसरात भुयारी पुलाजवळ मंगळवारी दुपारी दोन वाजता घडली. सौरभ सिद्धार्थ सोमकुवर (वय 18, रा. लुंबिनी नगर, कामठी) असे मृताचे नाव आहे.

कामठी: वडिलांना सोडून घरी परतणाऱ्या तरुणावर चाकूने गळा व पोटावर सोळा वार करून खून करण्यात आला. ही घटना कामठी येथील समतानगर परिसरात भुयारी पुलाजवळ मंगळवारी दुपारी दोन वाजता घडली. सौरभ सिद्धार्थ सोमकुवर (वय 18, रा. लुंबिनी नगर, कामठी) असे मृताचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सौरभ एका फोटो स्टुडिओत काम करीत होता. मात्र, मागील काही दिवसांपासून त्याची प्रकृती बरी नसल्याने तो घरीच होता. मंगळवारी दुपारी सौरभने त्याचे वडील सिद्धार्थ यांना मोटार स्टॅंड चौकात सोडले व घरी परत जात होता. भुयारी पुलाच्या मार्गाने घरी परत जात असताना आरोपींनी त्याच्यावर चाकूने हल्ला केला. गळ्यावर, पोटावर व पाठीवर सोळा वार करून त्याला जागीच ठार केले. यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. माहिती मिळताच नवीन कामठी पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी कामठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. नवीन कामठी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. या घटनेत पसार झालेल्या रोशन रमेश सकतले व राजू छोटेलाल सकतले या दोन संशयित आरोपींना अटक केली आहे. दोघेही घटनास्थळानजीकच्या एका ठिकाणाहून ऑटोमधून पसार होण्याचा प्रयत्न करीत होते.
पंधरा दिवसांपूर्वी झाला होता हल्ला
सौरभचा भाऊ सूरज मोबाईल चोरीच्या प्रकरणात काही महिन्यांपासून नागपूर मध्यवर्ती कारागृहात आहे. सौरभकडून चोरी प्रकरणाची माहिती जाणून घेण्यासाठी पोलिस त्याला बोलावत होते. त्याने चोरी प्रकरणातील भावासोबतच्या इतर आरोपींची नावे सांगितली असावी, असा संशय आरोपींना होता. यावरून 15 दिवसांपूर्वी त्याच्यावर ड्रॅगन पॅलेस पोलिस चौकीजवळही हल्ला करण्यात आला होता. त्या वेळी त्याने आपला जीव वाचविला होता. त्यामुळे या वेळीही त्याच आरोपींनी हल्ला केल्याचा संशय पोलिसांना आहे.
निरपराध होता सौरभ
सौरभ कोणत्याही गुन्ह्यात सामील नव्हता. तो उच्चशिक्षित होता. त्याच्या भावाने केलेल्या गुन्ह्याचा शोध लागावा यासाठी त्याला वारंवार पोलिस ठाण्यात बोलावत होते. यामुळे चोरीच्या गुन्ह्यात सामील असलेल्या इतर आरोपींना तो नावे सांगणार, अशी भीती होती. यातूनच सौरभचा खून करण्यात आला असावा, असा अंदाज आहे. सौरभच्या पश्‍चात आईवडील, दोन भाऊ व बहीण आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: murder at kamthi