गोळ्या झाडून कुख्यात गुंडाचा खून

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 सप्टेंबर 2016

नागपूर- मुख्यमंत्र्यांच्या घराजवळील गोकुळपेठ मार्केटमध्ये गुरुवारी भरदुपारी कुख्यात गुंड सचिन सोमकुवर आणि त्याचा साथीदार सुरेश ऊर्फ सूरज डोंगरे यांच्यावर गुंडांनी अंदाधुंद गोळीबार केला. यात सचिन जागेवरच मृत झाला, तर सुरेश गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नागपूर- मुख्यमंत्र्यांच्या घराजवळील गोकुळपेठ मार्केटमध्ये गुरुवारी भरदुपारी कुख्यात गुंड सचिन सोमकुवर आणि त्याचा साथीदार सुरेश ऊर्फ सूरज डोंगरे यांच्यावर गुंडांनी अंदाधुंद गोळीबार केला. यात सचिन जागेवरच मृत झाला, तर सुरेश गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

टीप दिली कुणी?
सचिनला राजा हा अापला ‘गेम’ करणार, याची पूर्वकल्पना होती. त्यामुळे तो नि:शस्त्र आणि एकटा कुठेही फिरत नव्हता. सचिनला संपविण्यासाठी राजा हा संधीची वाट पाहत होता. आज सचिन नि:शस्त्र असल्याची टीप सचिनच्याच टोळीतील कुणीतरी दिली. तसेच तो कुठे जात आहे, आणि त्याला कोठे गाठता येईल, याचीही टिप मिळाल्यामुळे भरचौकात गोळीबार करून सचिनचा खातमा केल्याची माहिती आहे.

बाजार बंद
गोकुळपेठ मार्केटमध्ये मोठा बाजार भरतो. दुपारी झालेल्या अंदाधुंद गोळीबारामुळे दुकानदारांत आणि ठेलेचालकांमध्ये एकच दहशत निर्माण झाली. त्यामुळे दुकानदारांनी दुपारीच बाजार बंद केला. कुणीही दुकानदार पोलिसांना सहकार्य करण्यास तयार नव्हते. 

आरोपींची संख्या वाढणार 
राजा परतेकी आणि बिट्टू हे दोघे कमरेला पिस्तूल खोचून दुचाकीने गोकुळपेठ मार्केटमध्ये आले. त्यावेळी अंकित पाली आणि एक अन्य साथीदार समोरच्या चौकात कार घेऊन उभे होते. तसेच सचिनवर पाळत ठेवणारे सचिनच्या मागे अन्य दुचाकीने पाठलाग करीत होते. गोकुळपेठ मार्केटमध्येही राजाचे दोन साथीदार सचिनची वाट पाहात उभे होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

कायदा व सुव्यवस्थेचे तीनतेरा
तत्कालीन पोलिस आयुक्‍त शारदाप्रसाद यादव यांचा गुन्हेगारी जगतात चांगलाच दरारा होता.  त्यांची बदली होऊन महिनाभराचा कालावधी उलटत नाही तोच गुन्हेगारांनी पुन्हा तोंड बाहेर काढले. पोलिस आयुक्‍त डॉ. के. व्यंकटेशम यांनी पदभार स्वीकारल्यापासून शहरात तीनदा गोळीबार झाला, तर महिलांवरील अत्याचारातही वाढ झाली आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले असून पोलिसांच्या कार्यप्रणालीवर संशय व्यक्‍त केला जात आहे. ६ सप्टेंबरला सकाळी आर्किटेक्‍ट एकनाथ निमगडे यांचा लाल इमली चौकात दुचाकीस्वार आरोपीने गोळ्या घालून खून करण्यात आला. त्यानंतर अजनी ठाण्याच्या हद्दीत ओंकारनगरात अजमेरी मटण शॉपचे मालक यासीन अन्सारीवर दुचाकीस्वार आरोपींनी गोळी झाडून खून करण्याचा प्रयत्न  झाला. ९ सप्टेंबरला सक्‍करदऱ्यातील बुधवारी बाजारात कुख्यात गुंड आशीष राऊत याचा भाजीविक्रेत्यांनी दगडाने ठेचून खून केला. तर दोन दिवसांपूर्वीच सक्‍करदरा पोलिस ठाण्यासमोरच दोघांनी शशिकला ठाकरे यांचा कैचीने गळा चिरून खून केला. त्यानंतर आज गुरुवारी गोकूळपेठसारख्या गजबजलेल्या परिसरात सचिन सोमकुवर या गुंडांची दहा गोळ्या घालून हत्या करण्यात आली तर त्याचा साथीदार सुरेश डोंगरे गंभीर जखमी झाला. शहरात भरदिवसा गोळीबार होत आहे आणि पोलिस कुठेही गंभीर नाही. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

पोलिसांचा वचक संपला
सूरज यादव हत्याकांडात बुधवारी न्यायालयाने कुख्यात डल्लू सरदार आणि त्याच्या टोळीतील आठ युवकांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या निर्णयामुळे समाजात चांगला संदेश जाईल आणि गुंडांमध्ये दहशत निर्माण होईल, असा समज होता. मात्र, गुरुवारी दुपारीच अंदाधुंद  गोळीबार करून एका गुंडाचा खून झाल्यामुळे आता कायद्याचीही भीती उरली नसल्याची भावना व्यक्‍त करण्यात येत आहे. 

बदलाची गरज 
अनेक पोलिस अधिकारी आणि कर्मचारी आपापल्या पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कुख्यात गुंडांशी ‘अर्थपूर्ण’ संबंध जोपासतात. काही पोलिसांचे उघडउघड गुंडांशी संबंध असतात. वरिष्ठसुद्धा त्याकडे दुर्लक्ष करतात. गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवायचे असल्यास सुस्तावलेल्या निरीक्षकांना बदलण्याची गरज निर्माण झाली आहे.

Web Title: murder in nagpur

टॅग्स