नागपूरात चौकीदाराचा खून 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

नागपूर - कंपनीच्या कार्यालयासमोर असलेला चिखल स्वच्छ करण्यावरून संगणक ऑपरेटर युवकाचा दोन चौकीदारांशी वाद झाला. युवकाने चौकीदारावर फावड्याने हल्ला केला. यात चौकीदार नारायण भिवापूरकर (50, रा. भांडेवाडी, कोष्टीपुरा) हे ठार झाले. गोलू वासनिक (21, रा. मानेवाडा) असे आरोपीचे नाव आहे. ही घटना कळमन्यात उघडकीस आली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमन्यातील चिखली ले-आउटमध्ये "मेहता काटा' नावाने वाहनाचे वजन करण्याचे कार्यालय आहे. या कार्यालयात गोलू वासनिक हा संगणक ऑपरेटर म्हणून दोन महिन्यांपासून नोकरीला आहे. त्याच कार्यालयात वर्षभरापासून नारायण भिवापूरकर हे चौकीदार आहेत. कार्यालयासमोर पावसामुळे चिखल साचला होता. येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या पायाने कार्यालय घाण होत होते. त्यामुळे गोलूने चौकीदार भिवापूरकर यांना चिखल साफ करण्यास सांगितले. मात्र, चौकीदाराने साफसफाई करण्यास नकार दिला. रविवारी दोघांत वाद झाला. रागाच्या भरात गोलूने भिवापूरकर यांच्या डोक्‍यात फावडे घातले. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांचा तासाभरात मृत्यू झाला. कळमना पोलिसांनी गोलू वासनिकवर गुन्हा दाखल करून अटक केली. 

सहकाऱ्याला दिली धमकी 
गोलू आणि चौकीदारामध्ये वाद झाला. चौकीदाराने शिवीगाळ केल्यामुळे गोलू मारण्यासाठी अंगावर धावला. चौकीदाराला मारहाण होऊ नये म्हणून सहकारी शेखर गजभिये (रा. भांडेवाडी) यांनी मध्यस्थी केली. त्यामुळे गोलूने शेखर यांच्यावरही हल्ला करीत ठार मारण्याची धमकी दिली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: murder in nagpur