प्रेयसीच्या हातावरील नावामुळे 'तो' अडकला जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

येथील मातामंदिर वॉर्डातील साक्षी शरद सुरकार (वय 17) या अल्पवयीन मुलीचा निर्जनस्थळी पोटावर वार करून गळा चिरून निर्घृण खून करण्यात आला.

हिंगणघाट (वर्धा) - येथील मातामंदिर वॉर्डातील साक्षी शरद सुरकार (वय 17) या अल्पवयीन मुलीचा निर्जनस्थळी पोटावर वार करून गळा चिरून निर्घृण खून करण्यात आला. ही घटना शहरापासून तीन किलोमीटर अंतरावरील रिमडोह शिवारात द्वारकानगरीच्या मागे रविवारी (ता. आठ) घडली, तर सोमवारी (ता. नऊ) सकाळी उघडकीस आली. 

राष्ट्रीय महामार्ग सातलगतच्या रिमडोह शिवारात असलेल्या या ले-आउटमागे आज सकाळी सात वाजता फिरायला गेलेल्या काही लोकांना मुलीचा मृतदेह रक्तात माखलेल्या स्थितीत आढळून आला. त्यांनी गावात येऊन या घटनेची रिमडोह येथील पोलिस पाटील कल्पना उईके यांना माहिती दिली. त्यांनी लगेच याबाबत हिंगणघाट पोलिसांना माहिती दिली. 

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी भीमराव टेळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. ठाणेदार सत्यवीर बंडीवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रशांत पाटणकर, गुन्हे शोध पथकाचे सुनील पाऊल झाडे, रवी वानखेडे, नीलेश तेलरांधे, समीर कामडी, अमित नाईक, सचिन भारशंकर, उमेश बेले, गजू धर्मे आदींनी खुनातील आरोपीचा शोध सुरू केला. त्यांनी काही वेळातच नांदगाव येथील पंकज राजू तडस (वय 19) यास संशयावरून ताब्यात घेतले. त्याने खुनाची कबुली दिल्याची माहिती आहे. हा खून प्रेम प्रकरणातील नैराश्‍यातून झाल्याची चर्चा आहे. याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदविला असून, तपासात काय अधिक माहिती उजेडात येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: murder in wardha

टॅग्स