तरोडी परिसरात का उडाली खळबळ? वाचा 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

> तरोडी खूर्द परिसरात ऑटोचालकाचा खून 
> अज्ञात आरोपींविरुद्ध हत्याकांडाचा गुन्हा 
> ओळखीच्याच व्यक्‍तीने हत्याकांड घडविल्याचा संशय 
> पोलिस विभागाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज 

नागपूर : वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तरोडी खुर्द गावाच्या परिसरात एका ऑटोचालकाचा अज्ञात आरोपींनी खून केला. ही खळबळजनक घटना रविवारी (ता. 17) सकाळी आठ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. अरुण संतोष वाघमारे (वय 40, रा. अंबेनगर, पारडी) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास तरोडी खुर्द रस्त्याच्या बाजूला गवतात एका युवकाचा मृतदेह पडून असल्याचे काही वाटसरूंना दिसले. त्यांनी लगेच पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून माहिती दिली. वाठोडा पोलिस ठाण्याचे ठाणेदार बापू ढेरे हे पथकासह घटनास्थळावर पोहोचले. पोलिसांनी रक्‍ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेत ताब्यात घेतला व उत्तरीय तपासणीसाठी मेयो रुग्णालयात पाठविला. 

पोलिसांनी मृत व्यक्‍तीची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. शेजारी असलेल्या दोन ते तीन खेड्यांमध्ये पोलिस कर्मचारी पाठविले. त्यांनी मृतदेहाच्या फोटावरून ओळख पटविली. मृत व्यक्‍ती ऑटोचालक अरुण वाघमारे असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यावरून पोलिसांनी अरुण यांच्या नातेवाईकांच्या शोध घेऊन घटनेची माहिती दिली. अरुण यांना पत्नी व दोन मुली आहेत. गेल्या आठ वर्षांपासून अरुण हे ऑटो चालविण्याचे काम करीत होते. या प्रकरणी तुर्तास वाठोडा पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध हत्याकांडाचा गुन्हा दाखल केला आहे. 

ऑटो आढळला बेवारस 
आरोपींनी अरुण वाघमारे यांचे त्यांच्याच ऑटोतून अपहरण केले असावे. अरुण यांच्यावर धारदार शस्त्रांनी वार करून खून केल्यानंतर ऑटो घेऊन पळ काढला असावा. अरुण यांच्या पारडीतील घराच्या काही अंतरावर आरोपींनी ऑटो सोडून पळ काढला. त्यामुळे हे हत्याकांड ओळखीच्याच आरोपींनी घडविले असल्याची माहिती आहे. 

हत्याकांडाचे सत्र 
शहरात हत्याकांडाचे सत्र सुरू आहे. दिवसा एक ते दोन किंवा एका दिवसाआड खून होतच आहे. यामुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुंड प्रवृत्तीच्या व्यक्‍तीचे खून होत असून, सामान्य नागरिकांचेही क्षुल्लक कारणावरून खून होत असल्याने भीतीचे वातावरण आहे. पोलिस विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच रात्रीची गस्त वाढवण्याची आवश्‍यकता आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The murder of a young man