आईलाच मारहाण करणाऱ्या धाकट्या भावाची हत्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 जून 2018

नागपूर : दारूच्या नशेत आईलाच मारहाण करणाऱ्या धाकट्या भावाच्या डोळ्यांत मिरचीपूड भिरकावून, कपडे धुण्याच्या मोगरीने डोक्‍यावर प्रहार करीत मोठ्या भावाने त्याची हत्या केली. जागनाथ बुधवारीतील टीबी दवाखान्याजवळ गुरुवारी मध्यरात्रीनंतर ही थरारक घटना घडली. घटनेनंतर आरोपीने स्वत:च ठाण्यात हजर होत पोलिसांना घटनेची माहिती दिली. 

संजय आमदे (41) असे मृताचे तर राजू आमदे (42) असे आरोपी भावाचे नाव आहे. आमदे कुटुंब जागनाथ बुधवारी येथील रहिवासी आहे. मृत संजय याला दारूचे जबर व्यसन होते. गुरुवारी रात्री उशिरा तो दारूच्या नशेत घरी पोहोचला. त्याने शिवीगाळ सुरू केली. आईलाही मारहाण केली. गोंधळामुळे राजू झोपेतून उठला. त्याने समजूत काढण्याचा प्रयत्न केला; मात्र संजय समजण्याच्या पलिकडे होता. त्याने राजूलाच मारहाण केली. सततच्या भांडणाला कंटाळून राजूने संजयला हॉलमध्ये आणले. त्याच्या डोळ्यांत मिरचीपूड भिरकावली. आरडाओरड करू नये म्हणून तोंडावर चादर टाकली आणि कपडे धुण्याच्या मोगरीने डोक्‍यावर फटके मारले. यामुळे संजय निपचीत पडला. काही वेळाने राजूने त्याला उठविण्याचाही प्रयत्न केला. पण, हालचाल पूर्णपणे थांबल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे राजूच्या लक्षात आले. यानंतर राजू स्वत:च तहसील ठाण्यात गेला आणि घटनेची माहिती दिली. 

राजू आणि संजय यांचे वडील रामभाऊ पोलिस विभागातून उपनिरीक्षक पदावरून निवृत्त झाले. यानंतर त्यांचा मृत्यू झाला. संजयला दारूचे व्यसन असल्याने सुमारे तीन वर्षांपूर्वी पत्नी त्याला सोडून गेली. यानंतर व्यसन अधिकच वाढले होते. पेन्शनच्या पैशांसाठी तो आईकडे तगादा लावून तिला मारहाण करायचा. या प्रकरणी तहसील पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करीत राजूला अटक केली आहे. 

Web Title: murder of the younger brother who beat up his mother