मायलेकाचा खून करणारा आरोपी गजाआड

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

नरखेड : दोन हजार रुपये देण्यास टाळाटाळ करणाऱ्या मालकाच्या पत्नी व चिमुकल्या मुलाच्या डोक्‍यावर कांडपाने ठेचून खून व घरी चोरी केल्याची घटना शनिवारी नरखेड येथील विवेकानंदनगरात उघडकीस आली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपीस नरखेड व नागपूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी अटक केली. रवी संतोष पटेल (वय 27, रा. मजीला, ता. बबेरू, जि. बंदा, उत्तर प्रदेश) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश शाहू याच्याकडे असलेला कारागीर आरोपी रवी पटेल याने शनिवारी (ता.7) दुपारी अडीच ते तीनच्या सुमारास प्रियांका दिनेश साहू (वय 25) व मुलगा अंशूल (वय 4) यांच्या डोक्‍यावर कांडपाने ठेचून खून केला होता. शनिवारी सकाळी बाजारात जाण्यापूर्वी दिनेशने पत्नी प्रियांकाला रवीचा हिशेब करून गावाला रवाना करण्यास सांगितले होते. मात्र, अधिकच्या पैशाच्या लालसेतून त्याने हा खून केल्याचे प्रथमदर्शी आढळून आल्याने काटोलचे उपविभागीय अधिकारी विक्रम कदम व नरखेडचे ठाणेदार मल्लिकार्जुन इंगळे यांनी संपूर्ण घटनाक्रमाची माहिती नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक राकेश ओला व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल जिट्टावार यांना दिली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: murderer arrested