पाचशे रुपयांसाठी चिमुकल्यांच्या गळ्यावर ब्लेड

पाचशे रुपयांसाठी चिमुकल्यांच्या गळ्यावर ब्लेड

नागपूर - पाचशे रुपये उसने न दिल्यामुळे माथे भडकलेल्या युवकाने शेजारी राहणाऱ्या क्रिश डिगांबर वाकोडे (वय सहा) आणि निहारिका डिगांबर वाकोडे (वय तीन) या चिमुकल्यांवर ब्लेडने हल्ला केला. दोन्ही चिमुकल्यांना रक्‍ताबंबाळ अवस्थेत पाहून आरोपी विलास भुजाडे (वय ३२) याने स्वतःच्याही गळ्यावर वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही थरारक घटना आज बुधवारी दुपारी चारला मानकापुरातील गीतानगरात घडली. जखमी दोन्ही चिमुकले आणि आरोपीवर मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 


डिगांबर वाकोडे हे माजी मंत्री रणजित देशमुख यांच्या बंगल्यावर माळी आहेत. त्यांची पत्नी वैशाली (वय २८) घरीच वाती बनविण्याचे काम करतात. त्यांना क्रिश आणि निहारिका ही दोन अपत्ये आहेत. क्रिश पहिल्या वर्गात तर निहारिका बालवाडीत जाते. त्यांच्या घराशेजारी आरोपी विलास भुजाडे पत्नी विशाखा, दीड वर्षाचा मुलगा राम व भाऊ नितीनसह राहतो. दोघेही भाऊ फर्निचर तयार करण्याच्या व्यवसायात आहेत. विलासने वैशाली यांना पाचशे रुपये उधार मागितले होते. मात्र, त्यांनी नकार दिल्याने बदला घेण्याचे त्याने ठरविले. 

बुधवारी दुपारी क्रिश आणि निहारिका घरासमोर खेळत होते. दोघांनाही त्याने घराच्या गच्चीवर नेले. तेथे ब्लेडने दोघांच्याही गळ्यावर, हातावर, मानेवर आणि पोटावर वार करून त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केला. दोघेही रक्‍ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर त्याने पहिल्या मजल्यावरील गच्चीवरून उडी घेत पळ काढला. पळताना त्याने स्वतःच्याही गळ्यावर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार शेजाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी दोन्ही चिमुकल्यांना मेयोत दाखल केले. नागरिकांनी पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून माहिती दिली. त्यानंतर तब्बल दीड तासानंतर पोलिस घटनास्थळावर पोहोचले. पोलिसांनी आरोपी विलासला अटक करून उपचारार्थ मेयोत दाखल केले आहे.

भजनातून आणले चिमुकल्यांना
दुर्गोत्सवामुळे चौकात मंडपात भजन सुरू होते. तेथे क्रिश आणि निहारिका हे दोघेही गेले. विलासने भजनातून दोन्ही मुलांना घरी आणले. कट रचल्यानुसार त्याने नवीन चार ब्लेड आणले होते. त्याने दोन्ही मुलांना छतावर नेले. तेथे प्रथम निहारिकाच्या गळ्यावर आणि मानेवर वार केले. त्यानंतर क्रिशवरही वार केले. चिमुकल्यांच्या आवाजाने त्यांची आई बाहेर आली. ती लगेच छताकडे धावली. तर दोन्ही मुले रक्‍ताच्या थारोळ्यात होती. विलासने लगेच पहिल्या माळ्यावरून उडी घेऊन पळ काढला.

दोन्ही कुटुंबाचे गाढे संबंध
डिगांबर वाकोडे व वैशाली यांच्याशी विलास भुजाडेच्या कुटुंबाचे चांगले संबंध होते. विलास पत्नी विशाखा, दीड वर्षाचा मुलगा राम व भाऊ नितीनसह राहतो. ते दोघेही भाऊ फर्निचर बनविण्याचा व्यवसाय करतात. विलासची वैशाली हिच्याशी मैत्री होती. त्यांचय दोन्ही मुलांचे नेहमी विलासच्या घरी येणे असायचे. मात्र, पाचशे रुपयांवरून वैशाली आणि विलासमध्ये वाद झाला. त्यामुळे ही घटना घडली.

क्रिशने बहिणीला घेतले मिठीत
विलासला दारू पिण्याची सवय होती. बहीण- भावाला विलासने छतावर नेले. खिशातून ब्लेड काढून निहारिकावर हल्ला करणे सुरू केले. बहिणीला वाचविण्यासाठी क्रिशने धाव घेतली. त्याने बहिणीला मिठीत घेतले. त्यामुळे विलासने क्रिशवरही ब्लेडने वार केले. निहारिका लगेच बेशुद्ध पडली तर क्रिशने मोठमोठ्याने आईला आवाज दिला. क्रिशच्या समजदारीमुळे निहारिकाचे प्राण वाचल्याची चर्चा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com