कसं काय बुवा? माझे भाकीत खरं ठरल 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

  • नवीन सरकारला गडकरींच्या शुभेच्छा 
  • राज्याला एक स्थिर सरकार मिळेल 
  • सर्व प्रश्‍नांची उत्तरे फडणवीस व पवार यांनी दिली 
  • राजकारण आणि क्रिकेटमध्ये काहीही अशक्‍य नाही 

नागपूर : क्रिकेट आणि राजकारणात अगदी शेवटच्या क्षणीसुद्धा गेम पालटू शकतो आणि काहीही होऊ शकते. मागे मी आपल्याला हे सांगितले होते. शनिवारी (ता. 23) राज्यात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वात जे सरकार बनले त्यावरून ते तुम्हाला पटले असेल, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज म्हणाले. 

खासदार महोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर शनिवारी (ता. 23) झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार डॉ. विकास महात्मे, खासदार महोत्सव आयोजन समितीचे आमदार प्रा. अनिल सोले, नवनिर्वाचित महापौर संदीप जोशी, माजी आमदार सुधाकर देशमुख यांच्यासह राज्यातील मोठे नेते यावेळी उपस्थित होते. 

गेल्या महिनाभरापासून पत्रकारांसह सामान्य जनतेला चिंता लागली होती सरकार कोणाचे येणार, कस येणार, काय होणार त्या सर्व प्रश्‍नांची उत्तरे शनिवारी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी महाराष्ट्राला दिली आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी दिलेल्या मुदतीत देवेंद्र फडणवीस आपले बहुमत सिद्ध करतील आणि एक स्थिर सरकार महाराष्ट्राला देतील, याचा मला विश्‍वास आहे, असेही नितीन गडकरी म्हणाले. 

याप्रसंगी नितीन गडकरी यांनी नवीन सरकारला भरभरून शुभेच्छा दिल्या. राज्यात आलेले सरकार स्थिर सरकार असेल असा विश्‍वास व्यक्‍त करताना काही दिवसांपूर्वी मुंबईत केलेल्या एका वक्‍तव्याची त्यांनी आठवण करून दिली. "राजकारण आणि क्रिकेटमध्ये काहीही अशक्‍य नाही', असे नितीन गडकरी बोलले होते. याचे महत्त्व आज तुम्हाला कळले असेल, असेही गडकरी यावेळी आवर्जून म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: My prediction came true