एन. कुमारच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

नागपूर :  वर्धमाननगरमधील पूनम मॉलचा काही भाग कोसळल्याप्रकरणी पोलिसांनी मॉलचे मालक एन. कुमार हिरचंदानी यांचा शोध सुरू केला. त्यांच्या घरावर नोटीस लावली आहे. अटक टाळण्यासाठी एन. कुमार यांनी अटकपूर्व जामिनासाठी धडपड सुरू केली असून, जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनअर्ज दाखल केला.

नागपूर :  वर्धमाननगरमधील पूनम मॉलचा काही भाग कोसळल्याप्रकरणी पोलिसांनी मॉलचे मालक एन. कुमार हिरचंदानी यांचा शोध सुरू केला. त्यांच्या घरावर नोटीस लावली आहे. अटक टाळण्यासाठी एन. कुमार यांनी अटकपूर्व जामिनासाठी धडपड सुरू केली असून, जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनअर्ज दाखल केला.
वर्धमाननगरातील पूनम मॉलची भिंत कोसळल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात अटक करण्यासाठी लकडगंज पोलिसांनी नामांकित बिल्डर एन. कुमार यांचा शोध सुरू केला. रविवारी लकडगंज पोलिसांनी एन. कुमार यांच्या बैरामजी टाउन येथील निवासस्थानाची झाडाझडती घेतली. मात्र, एन. कुमार आढळले नाही. पोलिसांनी त्यांच्या घरावर नोटीस चिकटवली. एन. कुमार यांनी चौकशीसाठी तत्काळ पोलिस ठाण्यात हजर राहावे, असे नोटिशीत म्हटले आहे. 16 ऑगस्टला रात्री पूनम मॉलची भिंत व सज्जा कोसळून चौकीदार जयप्रकाश रामनाथ शर्मा (वय 64, रा. शांती ले-आउट हिवरीनगर) यांचा मृत्यू झाला. या घटनेत मुक्ताबाई रामभाऊ गजभिये (वय 50, रा. हिवरीनगर झोपडपट्टी) व नंदकिशोर (वय 34) जखमी झाले. या प्रकरणी लकडगंज पोलिसांनी एन. कुमार व अन्य संबंधित व्यक्तींविरुद्ध निष्काळजीपणे मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप ठेवत भादंवि कलम 304, 337, 247 आणि 34 अन्वये गुन्हे दाखल केले. आज त्यांनी हा अर्ज दाखल केला. ही इमारत बरीच जुनी आहे. तसेच झालेली घटना घडावी, असा उद्देश नव्हता. त्यामुळे या प्रकरणी भादंविच्या कलम 304 अन्वये गुन्हा दाखल होऊ शकत नाही. जास्तीत जास्त कलम 304 (2) अन्वये होऊ शकतो. मात्र, हा गुन्हा जामीनपात्र आहे, असा युक्तिवाद एन. कुमार यांच्यामार्फत करण्यात आला. उद्या, बुधवारी सुनावणी होणे अपेक्षित आहे. ऍड. सुबोध धर्माधिकारी आणि ऍड. देवेंद्र चौहान बचाव पक्षाची बाजू मांडत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: N. Kumar's bail hearing today