नागनदी नदीजोड प्रकल्प राबवणार : बावनकुळे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

नागपूर : नागनदी, पोहरा, सांडनदी, सूर नदी हे सर्व एकमेकांना जोडण्याचा उपक्रम हाती घेतला जाणार आहे, अशी घोषणा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

नागपूर : नागनदी, पोहरा, सांडनदी, सूर नदी हे सर्व एकमेकांना जोडण्याचा उपक्रम हाती घेतला जाणार आहे, अशी घोषणा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
अप्पर आयुक्त-मुख्य अभियंता मृद व जलसंधारण प्रादेशिक क्षेत्र कार्यालयाचे उद्‌घाटन करताना ते बोलत होते. याप्रसंगी अप्पर आयुक्त सु. पा. कुशिरे, जलसंधारण अधिकारी बानुबाकोडे, अधीक्षक अभियंता, सोळंके, अधीक्षक अभियंता गवळी आदी उपस्थित होते. नागनदीतून वाहणारे सर्व सांडपाणी महानिर्मितीच्या खापरखेडा आणि कोराडी प्रकल्पाला देऊन नाग नदी झिरो डिस्चार्ज केली जाणार आहे. वीज प्रकल्पांना पेंचचे शुध्द पाणी यापुढे दिले जाणार नाही. सांडपाणी स्वच्छ करून वीज प्रकल्पाला दिल्यानंतर त्यातील 25 टक्के शुध्द पाणी पोहरा नदीत सोडले जाईल. ते शेतकऱ्यांसाठी असेल. नाग व पोहरा या दोन्ही नद्यांमध्ये प्रत्येकी 10 बंधारे बांधून स्वच्छ पाणी अडवले जातील. त्या बंधाऱ्यांमधून शेतीला पाणी घेता येईल. पेंच बांधून 40 वर्षांचा कालावधी झाला. पण, देखभाल होऊ शकली नाही. काटोल नरखेडसाठी एक ग्रीड तयार करण्याचे काम करण्याचे निर्देशही देण्यात आले.
विदर्भावरचा अन्याय दूर होईल
विदर्भावर झालेला अन्याय दूर करण्यासाठी मृद व जलसंधारण अप्पर आयुक्त-मुख्य अभियंता कार्यालय नागपुरात सुरू करण्यात आले असून जलसंधारणाची जास्तीत जास्त कामे केल्याशिवाय विदर्भाचा विकास होणार नाही, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagnadi river link project to be implemented: Bawankule