नागपूर @ 5.7

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 डिसेंबर 2018

नागपूर : शहरातील तापमानाचा पारा 5.7 अंशांपर्यंत घसरला असल्याने चांगलीच हुडहुडी भरली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे उपराजधानी अक्षरश: गारठू लागली आहे. पुढील दोन दिवस ही लाट अशीच राहण्याची शक्‍यता असल्याने थंडी वाढणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. चार वर्षांतील सर्वांत थंड दिवस म्हणून शुक्रवारची नोंद झाली आहे.

गेल्या आठवडाभरात शहराच्या तापमानात वाढ झाल्याने थंडीची तीव्रता कमी झाली होती. मात्र, गुरुवारी संध्याकाळपासून गारठा वाढत गेला व पारा 5.7 अंशांपर्यंत घसरला. विशेष म्हणजे, 29 डिसेंबर 2014 रोजी 5 अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तसेच आतापर्यंत यंदाचे सर्वांत नीचांकी तापमान 22 डिसेंबर रोजी 6.3 अंश इतके नोंदविण्यात आले होते. त्यामुळे वातावरणातील अनुकूल बदलांमुळे पुढील दोन दिवसांत विदर्भात थंडीची लाट कायम राहिली तर 2014 चा विक्रम मोडीत निघेल, अशी शक्‍यता हवामानतज्ज्ञांनी व्यक्‍त केली आहे.
एका वृत्तसंस्थेने 29 डिसेंबरचे तापमान गेल्या दहा वर्षांतील सर्वांत नीचांकी ठरणार असल्याचा अंदाज व्यक्‍त केला आहे. तसेच पारा 4 अंश असेल असेही नमूद केले आहे. त्यामुळे जर हा अंदाज खरा ठरला, तर ही विक्रमी नोंद ठरणार आहे.
थंडीने घेतला चौघांचा बळी
शहरातील कडाक्‍याची थंडी जिवावर उठणारी ठरली आहे. चार जणांना यात जीव गमवावा लागला आहे. कामठीतील मुख्य रस्त्याच्या कडेला 55 ते 60 वर्षे वयोगटातील अनोळखी व्यक्‍ती मृतावस्थेत आढळला. पोलिसांनी घटनास्थळ गाठले व व्यक्तीचा मृतदेह ताब्यात घेतला. दुसरी घटना तहसील कार्यालयाजवळ घडली. या परिसरात अनोळखी व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत सापडला. मेयो हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले असता त्याला डॉक्‍टरांनी मृत घोषित केले. रहाटे कॉलनी चौकातील फुटपाथवर अनोळखी व्यक्ती मृतावस्थेत आढळला. तर, कळमन्यातील सभागृहासमोरील रस्त्याच्या फुटपाथवर मृतावस्थेत व्यक्‍ती सापडला. हे दोन्ही व्यक्‍ती 40 ते 45 वर्षे वयोगटातील आहेत. वरील चौघांचाही मृत्यू थंडीने झाला असावा, असा अंदाज व्यक्‍त करत पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Web Title: Nagpur @ 5.7