"यू-टर्न' घेणे पडले महागात! ट्रकची ट्रकला धडक, दोघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 डिसेंबर 2019

जामठा शिवारात कॅन्सर हॉस्पिटलसमोर असलेल्या रस्ता दुभाजकालगत विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रक चालकाने अचानक "यू-टर्न' घेऊन रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने जाण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी दोन्हीही ट्रक एकमेकांवर आदळले.

हिंगणा : जामठा शिवारात हिंगणा बायपास मार्गावर दोन ट्रकमध्ये झालेल्या धडकेत एका ट्रकमधील दोन चालकांचा मृत्यू, तर क्‍लीनर गंभीर जखमी झाला. हा अपघात शनिवारी (ता. 7) पहाटे तीनच्या सुमारास घडला. 

पुरुषोत्तम ब्रजलाल चंद्रवंशी (वय 32, मारगाव), पुरण शिवलाल यादव (वय 29, डोंगरगाव) असे मृत्यू झालेल्या चालकांची नावे आहेत. त्यांच्याच सोबत क्‍लीनर रामदयाल यादव (वय 34) हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे तिघेही छत्तीसगड येथील राजनांदगाव जिल्ह्यातील रहिवासी असून, एकाच ट्रकने पांजरी टोल नाका येथून हिंगणा वळणमार्गाने अमरावती महामार्गाकडे जात होते. पुरुषोत्तम हा ट्रक चालवत होता. तर, दोघे केबिनमध्ये त्याच्याशेजारी बसले होते.

जामठा शिवारात कॅन्सर हॉस्पिटलसमोर असलेल्या रस्ता दुभाजकालगत विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रक चालकाने अचानक "यू-टर्न' घेऊन रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने जाण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी दोन्हीही ट्रक एकमेकांवर आदळले. या अपघातात एकाच ट्रकमधील पुरण याचा जागीच मृत्यू झाला. पुरुषोत्तम व रामदयाल हे गंभीर जखमी झाले. दुसऱ्या ट्रकचा चालक घटनास्थळावरून फरार झाला. हिंगणा पोलिसांना माहिती मिळताच हवालदार विनोद देशमुख व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

ट्रकचा चालक फरार

दोन्हीही जखमींना मेडिकल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिथे आज दुपारी 12 वाजता पुरुषोत्तम चंद्रवंशी याचा मृत्यू झाला. दुसऱ्या ट्रकचा चालक हा फरार आहे. हिंगणा पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पुढील तपास ठाणेदार सारीन दुर्गे यांच्या मार्गदर्शनात विनोद देशमुख करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur, accident, truck driver died