बंटी कुकडे यांनी का दिला तडकाफडकी राजीनामा?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 डिसेंबर 2019

बंटी कुकडे यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर या पदासाठी शहरातील अनेक नगरसेवक इच्छुक होते. त्यात प्रामुख्याने नगरसेवक बाल्या बोरकर यांचा समावेश होता.

नागपूर  : महापालिका परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे यांनी सभापतिपदाचा तडकाफडकी राजीनामा महापौर संदीप जोशी यांच्याकडे सादर केला आहे. राजीनामा देण्याचे कारण समजले नसून, भाजपच्या अंतर्गत गटबाजीमुळे त्यांना हा निर्णय घेण्याची वेळ आली अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. 

बंटी कुकडे यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर या पदासाठी शहरातील अनेक नगरसेवक इच्छुक होते. त्यात प्रामुख्याने नगरसेवक बाल्या बोरकर यांचा समावेश होता. इतकेच नव्हे तर तत्कालीन शहराध्यक्ष माजी आमदार सुधाकर कोहळे यांनी कुकडेंना राजीनामादेखील मागितला होता. मात्र, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बंटी कुकडे यांना कायम ठेवण्याचे आदेश दिले. त्यामुळे प्रत्येकाचाच नाइलाज झाला. मात्र, गडकरींच्या निर्णयानंतर कुकडेंना मिळालेली मुदतवाढ अनेकांच्या पचनी पडली नसल्याचे चिन्ह आहेत.

विशेष म्हणजे नितीन गडकरी यांनी बंटी कुकडे यांच्या कामांची अनेकदा प्रशंसा केली आहे. शहर बस सेवेबाबत नागरिकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी सोमवारी महापौर संदीप जोशी व परिवहन समिती सभापती बंटी कुकडे यांनी "आपली बस'च्या प्रवाशांसोबत संवाद साधला होता. सर्व समस्या जाणून घेतल्यानंतर महापौरांनी तातडीने याबाबत प्रस्ताव तयार करून त्या सोडविण्याचे निर्देश दिले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur, bunty kukde, nmc, resignation