चौक होणार रस्त्यांना समांतर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

नागपूर : शहरात चौकांपर्यंत सिमेंट रस्ते तयार करण्यात आले. चारही बाजूने चौकापर्यंत बांधकाम केलेले सिमेंट रस्ते उंच झाल्याने चौकात खोलगट भाग, जणू हौदच तयार झाले आहे. त्यामुळे वाहनधारकांना चौक ओलांडताना कसरत करावी लागत आहे. मात्र, आता चौकाचा खोलगट भाग सिमेंट रस्त्यांना समांतर करण्यात येणार आहे. यासाठी स्थायी समितीने आज 44.76 कोटींच्या खर्चाला मंजुरी दिली.

शहरात तिसऱ्या टप्प्यातील सिमेंट रस्त्यांची कामे सुरू होणार आहे. तिसऱ्या टप्प्यात 39 सिमेंट रस्त्यांचा समावेश होता, त्यात आता उत्तर नागपुरातील आणखी दोन रस्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. तिसऱ्या टप्प्यातही 302 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. सिमेंट रस्ता टप्पा एक व दोनमधील बरीच कामे पूर्ण झाली आहे. मात्र, सिमेंट रस्ते तयार करताना फूटपाथ, ड्रेनेज लाइनची कामे वगळण्यात आली होती. याशिवाय सिमेंट रस्ते केवळ चौकापर्यंत करण्यात आले. त्यामुळे चारही बाजूने उंच सिमेंट रस्ते व चौकात खोलगट भाग तयार झाला होता. त्यामुळे चौकातून वाहने काढताना वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागत होती. वाहनधारकांवर अपघाताची टांगती तलवार होती. याशिवाय नादुरुस्त तसेच कुठे उंच, कुठे खोल अशी फूटपाथची स्थिती असल्याने त्यावरून पादचाऱ्यांना चालणेही कठीण झाले होते. ड्रेनेज लाईन बुजल्याने पावसाळी पाणी रस्त्यावर येत होते. आज स्थायी समितीच्या बैठकीत लोककर्म विभागाचा तिसऱ्या टप्प्यातील सिमेंट रस्त्याचे टेबल सर्व्हे, जिओटेक्‍निकल तपासणी आदीच्या खर्चासह पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील सिमेंट रस्त्याच्या बाजूचे फूटपाथ, ड्रेनेज लाइनसह चौक समतल करण्यासाठी लागणाऱ्या खर्चाला मंजुरीचा प्रस्ताव मांडला होता. स्थायी समितीने आज 44.76 कोटींच्या खर्चाला मंजुरी दिली. याशिवाय तिसऱ्या टप्प्यातील सिमेंट रस्त्याचे टेबल सर्व्हे, जिओटेक्‍निकल तपासणी आदी कामांसाठी 24.76 कोटींच्या खर्चालाही मंजुरी देण्यात आली. त्यामुळे सिमेंट रस्त्यांमुळे खोलगट भाग तयार झालेले चौक समतल होऊन वाहनधारक, पादचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Web Title: Nagpur cement road news