हुडहुडी..! नागपूर गारठले, महाबळेश्‍वरपेक्षाही थंड

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 डिसेंबर 2019

विदर्भातील इतरही जिल्ह्यांमध्ये थंडीचा प्रभाव जाणवू लागला आहे. या आठवड्यात थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्‍यता प्रादेशिक हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे. 

नागपूर : गेल्या अनेक दिवसांपासून थंडीच्या प्रतीक्षेत असलेल्या विदर्भात उशिरा का होईना थंडीचे आगमन झाले. उत्तर भारतातील बर्फवृष्टीमुळे अचानक हवेत गारठा वाढला असून, दोन दिवसांत नागपूरचा पारा तब्बल सहा अंशांनी घसरला. शहरात गुरुवारी रात्री नोंद झालेले किमान तापमान संपूर्ण राज्यात नीचांकी ठरले. नागपूरने थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्‍वरलाही मागे टाकले. 

जम्मू काश्‍मीर, सिमला, मनाली, मसुरी या पहाडी भागांमध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू असल्यामुळे मागील दोन दिवसांपासून बोचरे वारे विदर्भाच्या दिशेने वाहू लागले आहेत. त्यामुळे हवेत गारठा वाढून पाऱ्यात प्रचंड घसरण झाली. थंडीचा सर्वाधिक फटका नागपूरला बसतो आहे. मागील 48 तासांत शहरातील किमान तापमानात जवळपास सहा अंशांची घसरण झाली. मंगळवारी रात्री 16.1 अंशांवर गेलेला पारा गुरुवारी 10.6 अंशांपर्यंत घसरला. उल्लेखनीय म्हणजे, राज्यात सर्वांत कमी तापमानाची नोंद नागपुरातच झाली. महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्‍वरलाही थंडीच्या बाबतीत नागपूरने मागे टाकले. महाबळेश्‍वरमध्ये गुरुवारच्या रात्री 14.2 अंश सेल्सिअची नोंद करण्यात आली. विदर्भातील इतरही जिल्ह्यांमध्ये थंडीचा प्रभाव जाणवू लागला आहे. या आठवड्यात थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्‍यता प्रादेशिक हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे. 

चक्रीवादळाचा धोका नाही 
अरबी समुद्रात तयार होत असलेल्या दोन चक्रीवादळांचा विदर्भात कसलाही धोका नाही. हवामान विभागाने दिलेली ही बातमी ओल्या दुष्काळाने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी आहे. अरबी समुद्रात एकाचवेळी पवन व अम्फन ही दोन चक्रीवादळे निर्माण होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. वेगाने येत असलेले हे वादळ मुंबई व किनारपट्‌टीवर धडकण्याची दाट शक्‍यता आहे. मात्र, त्यानंतर ते समुद्रमार्गे यमन, सौदी अरेबिया व पाकिस्तानकडे सरकण्याची शक्‍यता असल्यामुळे विदर्भात फारसा प्रभाव पडणार नाही. पावसाची शक्‍यता कमी असली तरी, ढगाळ वातावरण राहील, अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाचे संचालक मोहनलाल साहू यांनी "सकाळ'ला दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur is cooler than mahabaleshvar, cold