Crime : सोने नवीन करण्याच्या बहाण्याने ओळखीतल्या महिलेनेच गंडविले; 71 तोळे सोने ठेवले गहाण | Latest Marathi News | Breaking Marathi News | Marathi Tajya Batmya | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

Nagpur crime : सोने नवीन करण्याच्या बहाण्याने ओळखीतल्या महिलेनेच गंडविले; 71 तोळे सोने ठेवले गहाण

नागपूर : जुने असलेले सोने सोनाराकडून नवीन करुन देण्याच्या नावावर ७१ ग्रॅम सोन्याचे दागिणे आणि सव्वालाख रोख रुपये घेत, एका महिलेला तिच्या ओळखीचा महिलेने गंडविल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, महिलेने सोने घेत, ते दुसरीकडे गहाण ठेऊन त्यावर पैसे घेतल्याचीही माहिती उघड झाली आहे.

वर्षा महेंद्र चिकनकर (वय ४०, रा.गजानननगर,बहादूरा) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी महिलेविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. स्विटी उर्फ मोनाली प्रमोद कावडकर (वय ३८ रा. ब्रम्हानगर, नरसाळा रोड, दिघोरी) असे आरोपी महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षा यांची मावशी सुरेखा झलके या जुना बगडगंज येथे राहतात.

त्या २०२१ साली आपल्या मावशीकडे गेल्या असताना, त्यांच्या घराच्या शेजारी राहणारे किरपान यांची मुलगी स्विटी ही लहानपणापासून ओळखीची असल्याने तिचीही भेट व्हायची. तिने वर्षा यांचेशी जवळीक करीत, त्यातून विश्‍वास संपादन केला. यातून त्यांनी वर्षा यांना त्यांचे दागिणे जुने झाले असल्‍याचे सांगून ते दुरूस्त करीत, नवीन करुन आणून देण्याचे सांगितले. त्यातून १५ एप्रिल २०२२ ला त्यांनी एक छोटे मंगळसुत्र मोडून नवीन करायला दिले.

यानंतर एकएक दागिणा दुरुस्त करुन आणायला पुरत नसल्याने लक्ष्मी हार, मुलाची सोन्याची चेन, कानातले, सोन्याचा गोफ, काळा मण्याची माळ आणि मोठे मंगळसूत्र असे ७१ ग्रॅमचे सोन्याचे दागिणे घेऊन गेली. यावेळी त्यासोबत वेळोवेळी पैसे घेऊन एकूण १ लाख ३६ हजार ७०० रुपयेही घेऊन ३ लाख ४९ हजार ७०० रुपयांची फसवणूक केली. मात्र, स्विटी यांना दागिणे आणि पैसे परत मागितले असता, त्यांनी टाळाटाळ करण्यास सुरुवात केली.

त्यातून वर्षा यांनी ही माहिती पतीला दिली. त्यांनी स्विटी यांच्या पतीशी संपर्क साधला असता, त्यांनीही असमर्थता दर्शविली. त्यातून वाठोडा पोलिस ठाणे गाठून त्यांना लेखी तक्रार दिली. वाठोडा पोलिसांनी तपास केला असता, त्यांच्यासह इतरांचे दागिणे घेत, ते काही ज्वेलर्सकडे गहाण ठेवून त्यावर पैसे उचलल्याची माहिती समोर आली. त्यातून पोलिसांनी महिलेविरोधात ३ गुन्हे दाखल केले असून आरोपीचा शोध सुरू केला आहे.

टॅग्स :NagpurCrime News