नालंदानगरात 'सायको स्टॅबर'चा महिलेवर हल्ला!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

नागपूर : शहरात दहशत पसरवीत असलेल्या 'सायको स्टॅबर'ने आज अजनीतील नालंदानगरात आणखी एका महिलेवर हल्ला करून पळ काढला. त्यामुळे खळबळ उडाली आहे. घटना दुपारी एकच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून 'सायको स्टॅबर'विरुद्ध गुन्हा दाखल केला. गेल्या महिन्याभरात सात महिलांवर प्राणघातक हल्ला केल्यामुळे महिलांत भीतीचे वातावरण आहे. रेखा नामदेव पवार (वय 30, रा. कैलासनगर) असे जखमी महिलेचे नाव आहे. 

रेखा पवार ही धुणीभांडीचे काम करते. तिचे पती चालक असून ते सध्या केरळ येथे राहतात. दुपारी एकला नालंदानगरात राहणाऱ्या एका वकिलाच्या घरून धुणीभांडी करून रेखा कैलासनगराकडे पायी घरी जात होती. नालंदानगर गार्डनजवळ दुचाकीने आलेल्या 'सायको स्टॅबर'ने तिला अडविले. आरोपीने लाल रंगाचे हेल्मेट, काळ्या रंगाची दुचाकी आणि काळ्या रंगाचे कपडे घातले होते. त्याने महिलेवर चाकूसारख्या शस्त्राने हल्ला केला. महिलेला काही कळायच्या आतच तो दुचाकी घेऊन पळून गेला. महिलेच्या डाव्या हाताच्या मनगटाजवळ जखम झाली. त्यानंतर लगेच नागरिक मदतीसाठी धावले तोपर्यंत आरोपी पळून गेला होता.

तिने अनोळखी आरोपीने हल्ला केल्याची माहिती देताच एका युवकाने पोलिस नियंत्रण कक्षाला फोनवरून माहिती दिली. अजनी पोलिस लगेच घटनास्थळावर पोहोचले. त्यांनी महिलेची चौकशी करून घटना जाणून घेतली. तिच्यावर मेडिकल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. 

सायको स्टॅबरने आतापर्यंत सक्करदरा, अजनी व हुडकेश्वर पोलिस ठाण्यांतर्गत 7 महिलांवर हल्ला करून पळ काढला आहे. याच्या दहशतीमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या विकृताला अटक करण्याच्या मागणीकरिता शुक्रवारी शेकडो नागरिकांनी सक्करदरा पोलिस ठाण्याला घेराव केला आणि अटकेची मागणी केली. 

'सायको स्टॅबर' आणि अफवा 
दुपारी नालंदानगरात महिलेवर हल्ला झाला. त्यानंतर तासाभरात 'सायको स्टॅबर' पकडल्याची अफवा उडाली. अनेकांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला. पोलिस नियंत्रण कक्षानेही घटनेची माहिती दिली. अजनी पोलिस, हुडकेश्‍वर पोलिस, पोलिस उपायुक्‍त आणि सहायक पोलिस आयुक्‍तासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली.

Web Title: Nagpur Crime Crime against women Nalanda Nagar