मुलीचे शाळेतून अपहरण करण्याची धमकी; उकळली नऊ लाखांची खंडणी

सकाळ वृत्तसेवा
06.22 AM

शाळेतून बाहेर पडलेल्या सीमा यांच्या मुलीचे अश्‍विन, रोहिणी यांचा साथीदार असलेल्या सीताराम नावाच्या व्यक्‍तीने फोटो काढले. ते फोटो दाखवून मुलीचे अपहरण करण्याची धमकी दिली.

नागपूर : शाळेतून परतताना मुलीचे अपहरण करून तिला ठार मारण्याची धमकी देऊन एका दाम्पत्याने महिलेकडून नऊ लाख 82 हजार रुपयांचे दागिने व रक्‍कम खंडणीच्या स्वरूपात उकळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी दाम्पत्याविरुद्ध खंडणी व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 

अश्विन प्रकाश पाटणकर (वय 38) व रोहिनी अश्विन पाटणकर (वय 27, दोन्ही रा. दीक्षितनगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दाम्पत्याचे तर सीमा दिलीप नाकाडे (वय 35, रा. भीम चौक) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमा नाकाडे यांच्या पतीचे इलेक्‍ट्रिक साहित्य विक्रीचे मोठे दुकान आहे. त्यांना 15 व चार वर्षांच्या मुली आहेत. दोघीही जरीपटक्‍यातील एका नामांकित शाळेत शिकतात. त्यांचा शाळेतच सायंकाळी कराटे क्‍लास आहे. आरोपी अश्‍विन आणि रोहिणी यांच्या मुलाचासुद्धा याच शाळेत कराटे क्‍लास आहे.

यादरम्यान सीमा आणि रोहिणी यांची ओळख झाली. काही दिवस बोलणे झाल्यानंतर रोहिणी अचानक सीमा यांच्या घरी आली. त्यांनी गप्पा केल्यानंतर ती निघून गेली. त्यानंतर ती पती घरी नसताना वारंवार घरी येत होती. "माझ्या पतीचा बार अँड रेस्ट्रॉरेंटचा व्यवसाय असून त्यांना बारचे लायसन्स काढण्यासाठी दीड लाखाची गरज आहे,' असे रोहिणीने सीमा यांना सांगितले. मात्र, सीमा यांनी पतीला विचारून पैशाबाबत निर्णय घेईल, असा निरोप दिला. दुसऱ्या दिवशी आरोपी अश्‍विन आणि रोहिणी हे दोघेही शाळेच्या गेटसमोर भेटले. त्यांनी पैशाबाबत विचारणा केली. त्यावर सीमा यांनी पैसे देण्यास नकार दिला. 

मोबाईलने घेतले मुलीचे फोटो 
शाळेतून बाहेर पडलेल्या सीमा यांच्या मुलीचे अश्‍विन, रोहिणी यांचा साथीदार असलेल्या सीताराम नावाच्या व्यक्‍तीने फोटो काढले. ते फोटो दाखवून मुलीचे अपहरण करण्याची धमकी दिली. पैसे न दिल्यास मुलीला ठार मारण्याचीही भाषा वापरली. त्यामुळे सीमा या घाबरल्या. त्यांनी लगेच घर गाठले. त्यांनी कुणालाही माहिती न देता दीड लाख रुपये अश्‍विन आणि रोहिणी यांना दिले. 

वारंवार पैशासाठी धमक्‍या 
दीड लाख मिळाल्यानंतर अश्‍विन आणि रोहिणी यांनी सीमाला घाबरविण्यास सुरुवात केली. मुलीचे अपहरण करण्याची वारंवार धमकी दिली. अशाप्रकारे वेळोवेळी त्यांच्याकडून दागिने व रोख असा एकूण नऊ लाख 82 हजारांचा ऐवज उकळला. याबाबत दिलीप यांना काहीच माहिती नव्हते. काही दिवसांपूर्वी लग्नसमारंभासाठी दिलीप व सीमा जाणार होत्या. दिलीप यांनी सीमा यांना दागिन्याबाबत विचारणा केली. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. 

पोलिसांची घेतली मदत 
पाटणकर दाम्पत्याने ठार मारण्याची धमकी देऊन दागिने व रोख उकळल्याची माहिती सीमा यांनी दिलीप यांना दिली. त्यानंतर सीमा यांना घेऊन दिलीप यांनी जरीपटका पोलिस स्टेशन गाठले. सीमा यांनी तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ठार मारण्याची धमकी देऊन पाटणकर दाम्पत्याने पैसे उकळले की, अन्य कोणत्या कारणाने याचा कसून तपास जरीपटका पोलिस करीत आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur, crime, kidnapping