चिमुकलीवरील बलात्कार, हत्याकांडाच्या निषेधार्थ कळमेश्‍वरात कडकडीत बंद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

काही काही ठिकाणी मात्र विविध संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तसेच पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये काही प्रमाणात खटके उडाले होते. परंतु, परिस्थिती पूर्ववत होत होती.

नागपूर : कळमेश्‍वर तालुक्‍यातील लिंगा गावातील पाच वर्षीय चिमुकलीवरील बलात्कार आणि हत्याकांडाच्या निषेधार्थ आज सोमवारी कळमेश्‍वर शहरात बंद पुकारण्यात आला होता. या कडकडीत बंदला प्रतिष्ठान मालक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. लिंगा गावात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ग्रामीण पोलिसांचा मोठा ताफा तैनात होता. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच वर्षीय पीडित चिमुकलीवर मानसिक विकृती असलेला शेतमजूर आरोपी संजय पुरी याने शुक्रवारी सायंकाळी रस्त्यावरून अपहरण करून लैंगिक अत्याचार केला. पाप उघडकीस येण्याच्या भीतीपोटी आरोपी संजयने चिमुकलीच्या डोक्‍यावर मोठा दगड घालून निर्घृण खून केला. अत्यंत निर्दयीपणे केलेले कृत्य रविवारी सकाळी उघडकीस आले. त्यामुळे लिंगा गावासह संपूर्ण कळमेश्‍वर तालुक्‍यात खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी हत्याकांड उघडकीस आणून आरोपीला अटक केली. या घटनेच्या निषेधार्थ कळमेश्‍वर तालुक्‍यातील गावांमध्ये कडकडीत बंद पुकारला होता. कळमेश्वर-ब्राम्हणी परिसरातील संपूर्ण व्यापारपेठ कडकडीत बंद होती. कळमेश्वरातील शाळा, महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली होती.

या बंददरम्यान सकाळपासून घटनेच्या निषेधार्थ विविध सामाजिक संघटनांनी निषेध व्यक्त करीत कळमेश्वरातील प्रमुख मार्गावरील रस्त्यांनी रॅली काढली. या हत्याकांडातील आरोपीला फासावर लटकवा, तसेच पीडित कुटुंबीयांना आर्थिक मदतीचा हात द्या, अशी मागणी प्रत्येक सामाजिक संघटनेच्यावतीने करण्यात आली. कळमेश्वर पोलिस स्टेशनसमोर शेकडोंच्या संख्येने युवकांचा जमाव दिसून येत होता. कळमेश्वरात जागोजागी तहसील कार्यालय, स्थानिक बाजार चौक, बसस्थानक परिसर, पालिका कार्यालय परिसर आदी स्थानावर विविध जमाव मोठ्या संख्येने पाहायला मिळत होता. याकरिता कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता कळमेश्वर पोलिसांसह सावनेर, खापा, केळवद आदी ठिकाणाहून पोलिस दल, तसेच राखीव पोलिसांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. आजच्या आंदोलनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. हे विशेष. 

काही काही ठिकाणी मात्र विविध संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तसेच पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये काही प्रमाणात खटके उडाले होते. परंतु, परिस्थिती पूर्ववत होत होती. आजच्या आंदोलनामध्ये आमदार सुनील केदार, भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, रिपब्लिकन पार्टी, कॉंग्रेस कार्यकर्ते, बहुजन मुक्ती आंदोलन संघटनेच्या नेत्यांनी आंदोलनकर्त्यांना त्यांच्या मागण्यांबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन देऊन दिलासा दिला. 

हैदराबाद पोलिस जिंदाबाद 
नुकताच हैदराबाद पोलिसांनी डॉ. प्रियांका "रेप अँड मर्डर' कांडातील चारही आरोपींना पहाटेच्या सुमारास एन्काउंटर केले. या घटनेमुळे हैदराबाद पोलिसांचे देशभरातून कौतुक झाले. आरोपींना गोळ्या घाला किंवा आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी नागरिकांनी केली होती. "हैदराबाद पोलिस जिंदाबाद...नागपूर पोलिस मुर्दाबाद' अशी नारेबाजी नागरिकांनी केली. त्यामुळे पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला. 

आरोपीला 13 तारखेपर्यंत "पीसीआर' 
आरोपी संजय पुरी याला रविवारी रात्री कळमेश्‍वर पोलिसांनी अटक केली. त्याला आज सोमवारी न्यायालयात उपस्थित करण्यात आले. न्यायालयाने आरोपी संजय याला 13 तारखेपर्यंत (पाच दिवस) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्याचे कपडे आणि अन्य साहित्य पोलिसांना जप्त करायचे आहे. तसेच घटनास्थळावरही नेऊन "स्पॉट पंचनामा' करण्यात येणार आहे. 

लिंगा गावाला छावणीचे स्वरूप 
चिमुकलीवर बलात्कार आणि हत्याकांडामुळे लिंगा गावात तणावपूर्ण शांतता आहे. त्यामुळे गावात उद्रेक होण्याची शक्‍यता गृहीत धरून पोलिस अधीक्षक राकेश ओला आणि एलसीबीचे अनिल जिट्‌टावार यांनी गावात पोलिस कर्मचाऱ्यांचा ताफा तैनात केला आहे. त्यामुळे गावाला छावणीचे स्वरूप आले आहे. नागरिकांनाही शांतता राखण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

रविवारी रात्री दंगल घडविण्याचा प्रयत्न 
घटना उघडकीस आल्यानंतर याचा राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न काही कार्यकर्त्यांनी केला. रविवारी रात्री बारा वाजताच्या सुमारास काही कार्यकर्ते महिलांसह पोलिस ठाण्यावर मोर्चा घेऊन आले. मोर्चामधील कार्यकर्त्यांचा बेत दंगल घडवून आणण्याचा असल्याने पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला. यात काही बड्या नेत्यांनाही चोप देण्यात आल्याची चर्चा रंगली होती. 

कायदा व सुव्यवस्था राखण्याठी गावात चोख बंदोबस्त आहे. मी स्वतः प्रकरण हाताळत आहे. चिमुकलीच्या हत्याकांडातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी पोलिस तत्पर आहेत. परिस्थिती नियंत्रणात आहे. 
-राकेश ओला, पोलिस अधीक्षक, नागपूर ग्रामीण 

लिंगा येथे घडलेली घटना निंदनीय आहे. यातील पीडित कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. या हत्याकांडाचा खटला "फास्ट ट्रॅक' कोर्टात चालवून लवकरात लवकर आरोपीला कठोर शिक्षा व्हावी. 
-सुनील केदार, आमदार, सावनेर 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur, crime, rape, murder, linga, kalmeshwar