नागपूर डेंगीग्रस्त, मात्र एकही मृत्यू नाही

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

नागपूरः उपराजधानीत मागीलवर्षीप्रमाणे यावर्षीही डेंगीचा प्रकोप कायम आहे. ऑक्‍टोबर 2018 मध्ये पहिल्या पंधरा दिवसांत डेंगीचे अवघे 18 रुग्ण आढळून आले होते. मात्र 2019 च्या ऑक्‍टोबर महिन्यात 203 डेंगीग्रस्त आढळून आले आहेत. डेंगीचा हा उद्रेक नजरेसमोर असतानाही महापालिकेचा आरोग्य विभाग मात्र सुस्त आहे. केवळ अळ्या सापडल्या अशा घरमालकाला नोटीस देण्यात महापालिका धन्यता मानत आहे. दरवर्षी डेंगीचा आकडा फुगत आहे. 378 डेंगीग्रस्त शहरात आढळले असताना एकही मृत्यू झाला नसल्याचा दावा महापालिकेच्या आरोग्य विभागाने केला आहे. डेंगीच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागात नाही.

नागपूरः उपराजधानीत मागीलवर्षीप्रमाणे यावर्षीही डेंगीचा प्रकोप कायम आहे. ऑक्‍टोबर 2018 मध्ये पहिल्या पंधरा दिवसांत डेंगीचे अवघे 18 रुग्ण आढळून आले होते. मात्र 2019 च्या ऑक्‍टोबर महिन्यात 203 डेंगीग्रस्त आढळून आले आहेत. डेंगीचा हा उद्रेक नजरेसमोर असतानाही महापालिकेचा आरोग्य विभाग मात्र सुस्त आहे. केवळ अळ्या सापडल्या अशा घरमालकाला नोटीस देण्यात महापालिका धन्यता मानत आहे. दरवर्षी डेंगीचा आकडा फुगत आहे. 378 डेंगीग्रस्त शहरात आढळले असताना एकही मृत्यू झाला नसल्याचा दावा महापालिकेच्या आरोग्य विभागाने केला आहे. डेंगीच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागात नाही. यामुळे वैद्यकीय वर्तुळात महापालिकेच्या नोंदीबाबत आश्‍चर्य व्यक्त होत आहे. केंद्र सरकारने डेंगीला नोटिफाइड आजाराच्या यादीत टाकले आहे. त्यामुळे प्रत्येक शासकीय व खासगी रुग्णालयात डेंगीग्रस्तांची नोंद करणे आवश्‍यक आहे. या आजारावर नियंत्रणासाठी केंद्र व राज्य शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होतो. परंतु नागपूर महापालिकेच्या हद्दीत या आजारावर नियंत्रण मिळवता आले नाही.

मागील वर्षी 562 रुग्ण
नागपूर शहरात गतवर्षी डेंगीचे 562 रुग्ण आढळले होते. मात्र एकही मृत्यू झाला नाही. या वर्षी नागपुरात 378 रुग्ण आढळले आहेत. यावर्षीही एकही मृत्यू नसल्याची माहिती पुढे आली आहे. प्रचंड गतीने महापालिकेच्या हद्दीत डेंगी वाढत असूनही आरोग्य विभागातर्फे साथरोग यंत्रणा काम करीत नाही. शहरात कीटकनाशक फवारणीत वाढ करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. मात्र प्रत्यक्षात नागरिकांकडून डास वाढल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. शहरात खासगीत डेंगीने मृत्यू झाल्याचे अनेकांना सांगण्यात येत आहे. परंतु महापालिकेच्या यादीत मात्र डेंगीच्या मृत्यूची नोंद नाही. खासगी रुग्णालये डेंगीच्या रुग्णांसह मृत्यूबाबत माहिती लपवतात काय? असा सवाल पुढे येत आहे. या आकडेवारीला पुणे येथील आरोग्य विभागातील सहसंचालक स्तरावरील अधिकाऱ्याने दुजोरा दिला आहे.

विभागात 773 रुग्ण
आरोग्य उपसंचालक कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या नागपूर विभागातील भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यात एक जानेवारी ते 20 ऑक्‍टोबर या कालावधीत सुमारे 773 डेंगीग्रस्त आढळून आले आहेत. विशेष असे की, यातील 378 अर्थात 50 टक्के रुग्ण नागपुरातील आहेत. याशिवाय मेडिकलमध्ये 90 डेंगीग्रस्तांची नोंद झाली आहे. मेयोतही हा आकडा 40 वर पोहोचला आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpur is dengue-affected, but there is no death