पाडलं की हो! डॉन आंबेकरच्या चारमजली आलिशान बंगल्यावर बुलडोझर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

उर्वरित अनधिकृत बांधकाम तोडण्याची कारवाई  परत सुरू करण्यात येणार आहे. 

नागपूर : कुख्यात डॉन संतोष आंबेकरच्या दारोडकर चौकातील "आठवण' नावाच्या चारमजली आलिशान बंगल्यावर मनपाने बुलडोझर फिरवला. मनपाने नागपूर पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली. या कारवाईपूर्वीच पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. हे बांधकाम पाडून गुन्हे शाखेने आंबेकरचा बंगलाच नव्हे तर त्याच्या स्वप्नाचाही चुराडा केल्याची चर्चा आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष आंबेकरचे दारोडकर चौकातील इतवारी शाळेजवळ जुने घर होते. त्या जागी संतोष आंबेकरने चारमजली आलिशान बंगला बांधला होता. या घरात त्याचा भाचा नीलेश केदारही राहत होता. मनपाच्या आदेशाप्रमाणे डॉन आंबेकरने पाच-पाच फुटांची जागा सोडली नव्हती. त्यामुळे त्याच्या बंगल्याचे अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते.

प्रवर्तन विभागामार्फत 4 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास महाल झोन क्रमांक 06 अंतर्गत घर क्रमांक 443, इतवारी शाळेजवळ, दारोडकर चौक, नागपूर येथील "आठवण' नावाच्या संतोष आंबेकर आणि अण्णाजी अप्पा मोझरकर यांच्या मालकीच्या इमारतीचे अनधिकृत बांधकाम तोडण्याचे काम सुरू झाले. या इमारतीत कोटेजा यांनी किरायाने घेतलेल्या तळमजल्याचे व चौथ्या मजल्याचे अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले. ज्यामध्ये चौथ्या मजल्यातील आणि आतील भागाच्या भिंती व स्लॅब तोडण्यात आला. 

इमारतीच्या दक्षिण भागातील तळमजल्यावरील भिंती तोडण्यात आल्या. तसेच तळमजल्यावरील कोटेजा यांनी किरायाने घेतलेल्या कपड्याच्या दुकानाचे शटर आणि भिंती तोडण्यात आल्या. हे संपूर्ण बांधकाम नागपूर महानगरपालिकेच्या मंजुरीच्या विरुद्ध असून तळमजल्याचे 55.29 चौरस मीटर, पहिल्या मजल्याचे 55.29, दुसऱ्या मजल्याचे 55.29, तिसऱ्या मजल्याचे 55.29 व चौथ्या मजल्याचे 63.91 चौरस मीटर अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. 

आजची कारवाई सुरळीत पार पडावी म्हणून लकडगंज पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नरेंद्र हिवरे व गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या मार्गदर्शनखाली चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. त्याचबरोबर झोन क्रमांक 6 चे अभियंता पुंडलिक ढोरे, सहायक आयुक्त अशोक पाटील, प्रवर्तन निरीक्षक संजय कांबळे, नितीन मंथनवार, भास्कर माळवे, शादाब खान आणि विशाल ढोले यांनी पार पाडली. 

उर्वरित अनधिकृत बांधकामही तोडणार 
हे अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी 13 नोव्हेंबर 2019 रोजी कलम 3 झेड (1) अन्वये नोटीस बजावण्यात आली होती. यामध्ये पहिल्या माळ्यावर माधुरी मोझरकर व दुसऱ्या माळ्यावर शैलेश केदार यांचे वास्तव्य असून त्यांना अनधिकृत बांधकाम पाडायचे असल्यामुळे घर रिकामे करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर पुढील कारवाईस सुरवात करण्यात आली. उर्वरित अनधिकृत बांधकाम तोडण्याची कारवाई गुरुवारी परत सुरू करण्यात येणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur, don santosh ambekar, nmc, illegal construction