व्यापाऱ्यांच्या केळीबागवर बुलडोझर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

नागपूर : मध्यमवर्गीयांची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केळीबाग मार्गाला रुंद करण्यासाठी एकूण 23 दुकाने आज भुईसपाट करण्यात आली. महापालिकेने बुलडोझर चालवून एका बाजूची सर्व दुकाने हटविली.

नागपूर : मध्यमवर्गीयांची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केळीबाग मार्गाला रुंद करण्यासाठी एकूण 23 दुकाने आज भुईसपाट करण्यात आली. महापालिकेने बुलडोझर चालवून एका बाजूची सर्व दुकाने हटविली.
महापालिकेतर्फे केळीबाग रुंदीकरणासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न केले जात आहेत. मात्र, तेथील दुकानदार न्यायालयात गेल्याने दहा वर्षे या मार्गाचे रुंदीकरण रखडले होते. न्यायालयाने दुकानदारांची याचिका फेटाळून लावल्याने महापालिकेने दुकाने हटविण्याची कारवाई सुरू केली. मागील आठवड्यात यावरून मोठा तणाव निर्माण झाला होता. त्यानुसार एक आठवड्यांचा वेळ दुकानदारांना देण्यात आला होता. अनेकांनी स्वतः आपले साहित्य काढून बांधकाम पाडले होते. आज महापालिकेने बुलडोझरने एका बाजूची सर्व दुकाने पाडली. या मार्गाच्या दुतर्फा दुकाने आहेत.
कोतवाली पोलिस ठाण्याच्या बाजूला असलेल्या दुकानदारांना ही जागा नागपूरचे राजे भोसले यांनी उपलब्ध करून दिली होती. त्यामुळे ही जागा महापालिकेला अधिग्रहित करावी लागणार आहे. केळीबागच्या रुंदीकरणासाठी महापालिकेच्या महाल झोन कार्यालयाची इमारतसुद्धा पाडण्यात आली आहे. याशिवाय गडकरी वाड्याच्या मागच्या बाजूला असलेली घरे व दुकाने तोडण्यात येणार आहे. थेट सी. पी. अँड बेरार कॉलेजपर्यंत हा रस्ता रुंद केला जाणार आहे.
इतिहास जमा होणार
1702 साली नागपूर शहराची स्थापना झाल्यानंतर आधी गोंड व नंतर भोसले साम्राजाचा साक्षीदार ठरलेला केळीबाग मार्ग आता इतिहास जमा होणार आहे. रुंदीकरणासाठी या मार्गावरील अनेक जुनी मंदिरे, वाडे, दुकाने पाडण्यात येत आहेत. केळीबागला लागूनच बुधवार बाजार आहे. भोसले यांच्या काळात बाजाराच्या जागेवर घोड्यांची पाग होती. टिळक रोड आणि वॉकर रोड यांना जोडणारा हा मार्ग नागपुरातील अनेक घटनांचा साक्षीदार आहे. स्वातंत्र्याच्या आंदोलनात शुक्रवार दरवाजावरून इंग्रजांनी गोळीबार केला होता. बडकस चौकातील संतोषी माता मंदिर, महालक्ष्मी मंदिर, शिरपूरकरांचे राम मंदिर, जैन मंदिर, कालभैरव मंदिर केळीबाग रोडवर आहेत. तेही इतिहासजमा होणार आहेत.

Web Title: nagpur encroachment news