नागपूर : तासाभरातच झाले होत्याचे नव्हते; रिंग रोडवर मलब्याचे ढिगारे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

एकीकडे अनेकांचे घरांचे स्वप्न धुळीस मिळत असतानाच बघ्यांनी मात्र चांगलीच गर्दी केली. रिंग रोडवरील दुभाजकांवर बसलेल्या नागरिकांमुळे वाहतुकीतही अडथळा निर्माण झाला. 

नागपूर : रिंग रोडवरून ये-जा करणाऱ्यांचे लक्ष वेधून घेणाऱ्या इमारतींवर आज नागपूर सुधार प्रन्यासने हातोडा चालविला. त्यामुळे चकाकणाऱ्या इमारतींचे काही तासांमध्येच होत्याचे नव्हते झाले. पोलिसांच्या संरक्षणात करण्यात आलेल्या कारवाईने शताब्दीनगर चौक ते ओंकारनगर चौकापर्यंतच्या दुकानदारच नव्हे तर घरमालकांतही खळबळ माजली. उशीरा रात्रीपर्यंत ही कारवाई सुरू होती. 

नागपूर सुधार प्रन्यासने रस्त्यांवरील अनधिकृत बांधकामाविरुद्ध धडक कारवाई सुरू केली. आज सकाळी अकरा वाजतापासून शताब्दीनगर चौक ते ओंकारनगर चौकापर्यंत शुक्‍लानगर परिसरातील चकाकणाऱ्या घरांवर बुलडोजर फिरवला. यात एक इमारत अलिकडच्याच काळात बांधली होती. नासुप्रचे पथक बघताच घरमालकांत धडकी भरली. मोठा पोलिस ताफा, जेसीबी, नासुप्रचे अधिकारी, कर्मचारी धडकल्याने एकच खळबळ माजली. हा ताफा बघताच बघ्यांनीही मोठी गर्दी केली. त्यामुळे रिंग रोडवरील वाहतूकही प्रभावित झाली. नव्या इमारतीचे रस्त्यापर्यंत आलेल्या बांधकाम बुलडोजरने पाडण्यात आले. त्यानंतर बाजूच्या इमारतीवर लक्ष केंद्रीत करण्यात आले. बाजूच्या तीन मजली इमारतीचा पुढील भाग तोडण्यात आला. दिमाखात उभ्या असलेल्या या इमारतीचा मलबा काही तासांमध्ये रस्त्यांवर पडला. सकाळपासून सायंकाळपर्यंत या भागातील 19 अनधिकृत इमारती होत्याच्या नव्हत्या झाल्या. पोलिसांच्या बंदोबस्तामुळे घरमालकांचाही विरोध मोडित काढण्यात आला. या भागातील 9 मीटर रस्ता मोकळा झाला. मात्र, या रस्त्यावर इमारतींचा मलबा बघून घरमालकांनाही गहिवरून आले. मोठ्या उत्साहात बांधलेले घर पाडताना घरातील महिलांचे डोळेही पाणावले. ही कारवाई अभियंता एस. एन. चिमुरकर, विभागीय अधिकारी अनिल राठोड, सहायक अभियंत संदीप राऊत, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक रवी रामटेके व नासुप्रचे क्षतिपथक प्रमुख वसंत कन्हेरे यांनी केली. यावेळी अजनी पोलिसांचा मोठा ताफा होता. 

महापालिकेचीही कारवाई 
महापालिकेनेही सतरंजीपुरा झोनअंतर्गत इतवारी नेहरू पुतळा, संत गुलाबबाबा गॅरेज परिसरातील अनधिकृत बांधकाम पाडले. हनुमाननगर झोनअंतर्गत मानेवाडा रोडवरील अतिक्रमण हटविण्यात आले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur, encroachment, nit, illegal construction